Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जगातला आळशी अभिनेता म्हणजे मी....
सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 13, 2010 AT 12:00 AM (IST)
(ज्योती व्यंकटेश - jv4000@gmail.com)


"इश्‍किया'च्या यशानंतर अर्शद वारसी सध्या "सातवे आसमान पे' आहे. मुन्नाभाईमधल्या "सर्किट'नंतर "इश्‍किया'मधला "बब्बन'ला प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतलंय. या चित्रपटानं अर्शद वारसीला वेगळी ओळख निर्माण करून दिलीय. अभिनेता व निर्माता म्हणून काम केल्यावर अर्शद वारसी दिग्दर्शक होण्याची इच्छा व्यक्त करतो. "इश्‍किया'चं यश आणि त्यापुढील वाटचालीबद्दल अर्शदशी झालेला मनमोकळा संवाद.

"इश्‍किया' या वर्षीचा "हिट' झालेला एकमेव चित्रपट आहे. कसं वाटतं?
अर्शद - फक्‍त दहा दिवसांत "इश्‍किया'नं २० कोटींचा धंदा केलाय. मला "टॉप ऑफ द वर्ल्ड' झाल्यासारखं वाटतं. मी जेव्हा वाचलं की क्रूर डोळ्यांच्या खलनायक बब्बननं सगळीकडे हलकल्लोळ माजवलाय, मला एकदम आकाशाला गवसणी घातल्यासारखं वाटलं.

"इश्‍किया'मधील बब्बनची भूमिका तुझ्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे का?
- "इश्‍किया'मध्ये मला नसिरुद्दीन शाह व विद्या बालन यांच्याबरोबर भूमिका मिळाली. याची कथा दोन पिढ्यांची आहे. यातला एक तर शांत आहे, तर दुसरा आक्रमक आहे. यातल्या बब्बन नावाच्या टपोरी मुलाची भूमिका साकारणं अजिबात कठीण नव्हतं. एकदा भूमिकेचा गाभा समजवून घेतला आणि "स्क्रिप्ट'वर लक्ष दिलं की काहीच वेगळं वाटत नाही.

दिग्दर्शक अभिषेक चौबेनं जेव्हा विद्या बालनबरोबर "किसींग सीन' करायला सांगितला, तेव्हा तू नर्व्हस झालास म्हणे?
अभिषेकनं सांगितलं की "किसिंग सीन' कथेची गरज आहे. तेव्हा मी तो प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं म्हणजे सगळ्यात कठीण होतं ते माझी पत्नी मारियाला पटवून देणं, कारण "ऑन स्क्रीन' हा माझा पहिलाच "किसिंग सीन' होता.

महेश भट यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करून तू तुझ्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात केली होतीस म्हणे?
हो, महेश भट यांच्या "ठिकाना' आणि "काश' या चित्रपटासाठी मी सहायकाचं काम केलं होतं. बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी फक्त १९ वर्षांचा होतो. मला खात्री आहे, त्या चित्रपटात असलेल्या अनिल कपूर व अमृता सिंग यांना लक्षातही नसेल, की तेव्हा मी तिकडे होतो. खरं तर, मी मलाही ओळखू शकणार नाही.

"इश्‍किया'च्या यशाचा फायदा तुझ्या स्वनिर्मित "हम तुम और घोस्ट'ला होईल, असं तुला वाटतं का?
"इश्‍किया'नंतर आयुष्य असंच सरळ चालेल याबद्दल खात्री देता येणार नाही. पण एवढं मात्र नक्की, की "इश्‍किया'च्या यशाचा माझ्या स्वनिर्मित चित्रपटाला फायदा होईल, त्यात मी एकटाच नायक आहे आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्या खांद्यावर असेल. याचा विचार करणंच भीतीदायक आहे.

विद्या बालनबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
"लगे रहो मुन्नाभाई'पासून विद्याची आणि माझी चांगली मैत्री झाली होती. विद्या खूप हसते. सेटवर विद्या हसायचं कधी थांबवणार, याची नसीरभाई व मला वाट पाहावी लागायची. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच; पण चांगली माणूसही आहे आणि "इश्‍किया'बद्दल म्हणाल, तर ती या चित्रपटाची नायिकाच नाही, तर नायकही व खलनायकही आहे. मी आणि नसीरभाई जय आणि वीरूसारखे आहोत.

तू फार कमी चित्रपट स्वीकारतोस?
मला ९० टक्के स्क्रिप्टस्‌ या आवडतच नाहीत; पण त्यामुळे माझ्याकडची कामं कमी होतील, अशी मला भीती वाटते. तसंच, विविध "शूटस्‌'साठी सतत नऊ महिने घरापासून लांब राहिल्यानं माझं, माझी मुलं झीक व झारा यांच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मारिया माझ्यावर खूप चिडते. त्यामुळे मी जास्त चित्रपट घेत नाही. मी माझ्याकडे आलेल्या दहा स्क्रिप्टस्‌पैकी आठ नाकारतो; पण मला खात्री असते, त्या दोन फिल्म्स "बॉक्‍स ऑफिस'वर हीट होणार. माझ्याकडे जे आहे त्यातूनच मला निवडायचंय.

अभिनयाकडे बघण्याची तुझा दृष्टिकोन कसा आहे?
तेरा वर्षांपूर्वी मी पहिला चित्रपट केला, "तेरे मेरे सपने'; पण मला अभिनय करता येतो हे मला गेल्या दोन वर्षांपासूनच कळलं, हे मी कबूल करतो. इतर अभिनेत्यांना त्यांचे संवाद म्हणताना किंवा काही दृश्‍य करताना अडखळताना बघितलं तरी आता अभिनय मला माझ्या हातचा मळ वाटतो. मला अभिनय करता येतो हे इतरांना सांगायला मी या इंडस्ट्रीत आलो नाहीय, तर चांगलं काम माझ्याकडे यावं याचीच मी वाट बघत असतो. चांगल्या स्क्रिप्टच्या मी शोधात असतो. आपला चित्रपट चांगला चालावा, एवढीच माझी इच्छा असते. माझं काम वाईट झालं, तरी माझी काही हरकत नाही.

अभिनेता म्हणून तुला मिळालेली सगळ्यात मोठी दाद कोणती?
"तेरे मेरे सपने'साठी मी जयाजींबरोबर काम करत होतो. तेव्हा त्यांनी मला दाद दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, तू अल पचिनोसारखा आहेस आणि म्हणून तू "स्कारफेस'सारखा चित्रपट केला पाहिजेस.

सध्या तुझ्याकडे काहीच काम नाही, हे खरं आहे का?
"इश्‍किया' हीट झाला. या चित्रपटानं रामगोपाल वर्मांच्या "रण'लाही मागे टाकलं आणि खरं सांगायचं तर मी जगातला सगळ्यात आळशी अभिनेता आहे आणि त्यामुळे सध्या मी बेकार आहे, हे सांगायला लाजत नाही. तसंच, "हम तुम और घोस्ट' हा कबीर कौशिकनं दिग्दर्शित केलेला, निर्माता म्हणून माझा पहिला चित्रपट तयार आहे आणि त्याशिवाय "धमाल', "गोलमाल' आणि "मुन्नाभाई'च्या "सिक्वेल'ची वाट बघतोय.

मुन्नाभाईच्या (३ इडियटस्‌) सिक्वेलमध्ये तुला घेतलं नाही म्हणून तू नाराज आहेस का?
अजिबात नाही, आधीच्या चित्रपटांत होतो म्हणून पुढच्या चित्रपटात घेणाऱ्यांपैकी राजू हिरानी नाही. मी जर "थ्री इडियटस्‌'मध्ये असतो तर आनंदच झाला असता; पण आर. माधवन आणि शर्मन जोशीच्या भूमिकेपैकी कोणतीही भूमिका मला सूट झाली नसती असं त्याला वाटलं असेल. हा दिग्दर्शकाचा विचार आहे.

दिग्दर्शनाकडं वळण्याची इच्छा आहे का?
निर्माता म्हणून मी अनुभव घेतलाय. आता दिग्दर्शक व्हायची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की मला दिग्दर्शनही सहज जमेल. मला त्यात काही कठीण वाटत नाही. मेल गिब्सन, आमीर खान, अजय देवगण आणि सनी देओल यांनीही स्वतःसाठी दिग्दर्शन केलंय. प्रत्येक अभिनेत्याला दिग्दर्शक व्हावंसं वाटू शकतं. जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, तेव्हाही मला अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक व्हावंसं वाटलं होतं. मला माझ्या कथा स्वतः सांगण्याची इच्छा आहे अन्‌ त्यामुळे मला चित्रपट बनवायची इच्छा आहे.

विनोदी अभिनेता म्हणून छाप पडल्याचं दुःख आहे का?
विनोदी अभिनेता म्हणून ओळखल्यानं मला अजिबात लाज वाटत नाही; पण मी गंभीर भूमिकाही करू शकतो. मी "तेरे मेरे सपने'मध्ये विनोदी भूमिका केली नसती, तर माझ्याकडे विनोदी भूमिका आल्याच नसत्या. मी तर असं म्हणेन, जर "तेरे मेरे सपने' चालला नसता, तर मी विनोदी अभिनेता झालोच नसतो. विनोदी भूमिका करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. सध्या अक्षयकुमार आणि रितेश देशमुख हे विनोदी भूमिका चांगल्या प्रकारे करू शकतात, असं माझं मत आहे.

मारियाने चित्रपटांत काम करणं का सोडलं?
बायको अभिनेत्री असणं हे खूप कठीण असतं आणि त्यातही मारिया खूप चांगली अभिनेत्री असूनही तिने अभिनय सोडला. लग्नाच्या वेळी आमचं असं ठरलं, की मुलांसाठी दोघांपैकी एकानं काम सोडायचं. मारिया आई आहे, त्यामुळे तिच्यावरच मुलांची जबाबदारी येते.

तुमची मुलंही तुमच्या पावलावर पाऊल ठेवतील, असं तुला वाटतं का?
मुलगी झारामध्ये अभिनयाचे गुण आहेत, पण झीकला मात्र "गोल'चं शूट बघितल्यापासून फुटबॉल आवडायला लागलाय. माझ्या मुलांची या क्षेत्राशी ओळख झालीच आहे. कदाचित दोघंही अभिनयाकडे वळतीलही; पण हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
 
'प्रीमियर' आहे मराठीतील एकमेव ग्लॅमर मासिक. वर्गणीदार व्हायचेय? ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject मध्ये लिहा Premier आणि मेलमध्ये तुमचा सविस्तर पत्ता.
 
'आमीर' प्रथमच मराठीत...ऑनलाईन ऑर्डर इथे नोंदवा.

प्रतिक्रिया
On 4/23/2010 12:01 PM NITIN said:
SMART CIRCUIT
On 31/03/2010 00:34 Vikas said:
Arshad is a good actor. He is the best when he is tapori. His tapori style is very much different than any other.
On 3/26/2010 5:05 PM Amit said:
Arshad Warsi is good actor. However he needs to break his stereotype image of a tapori comedian.
On 3/18/2010 12:44 AM Shubhangi said:
Hi Arshad, I like your attitude towards life and the frankness. Keep up the good work. and I love to watch your movies.
On 3/14/2010 11:54 AM Prasanna said:
very good


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: