'विदांना "ज्ञानपीठ' मिळाले होते एकमताने'
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, March 15, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - साहित्य क्षेत्रातील निवडणुका किंवा तत्सम वादांना टाळणारे विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारही एकमतानेच मिळाला होता. आतापर्यंत फारसा कोणाला माहिती नसलेला हा तपशील ज्ञानपीठ निवड समितीचे माजी सदस्य व हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक, कवी अशोक वाजपेयी यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितला.
""विंदांना ज्ञानपीठ मिळाले त्याच्या आधीच्याही वर्षी निवड समितीच्या बैठकीत त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र, त्या वर्षी विंदांबरोबर आणखी एका साहित्यिकाचे नाव आले. पुढील वर्षी पुरस्कारासाठी विंदांचेच नाव निश्चित करण्याचे सुचविले. त्यानुसार पुढील वर्षी निवड समितीने सर्वानुमते त्यांच्या नावावर "ज्ञानपीठ'साठी शिक्कामोर्तब केले. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विंदांची तटस्थता आणि शांतपणाने मी थक्क झालो,'' असे वाजपेयी यांनी सांगितले.
""वैचारिक बांधिलकीला आपल्या कवितेवर कधीही स्वार न होऊ देणारा महान कवी आपल्यातून गेला,'' अशा शब्दांत राजधानीतील ज्येष्ठ साहित्यिकांनी विंदा करंदीकरांच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी म्हणाले, ""विख्यात गायक कुमार गंधर्व यांनी तर विंदांच्या एका पुस्तकाच्या दहा-बारा प्रती घेऊन ठेवल्या होत्या. त्या त्यांनी आम्हाला दिल्या. अशी विंदांशी माझी पहिली ओळख झाली. त्यांच्याशी माझी पहिली भेट 1985 मध्ये झाली. भारत भवनात "कवी भारत' संमेलनासाठी विंदा आले होते. ते आले तेव्हा प्रख्यात कवी अग्नेय यांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. आमच्याकडे वळून ते म्हणाले ""अरे भाई, ये विंदा है. मराठी काव्य का गोविंद (कृष्ण)! '' त्यानंतर साहित्य अकादमीतर्फे "इंडिया इंटरनॅशनल सेंटर'मध्ये त्यांचा कार्यक्रम होता. त्यानंतर आम्ही किती तरी वेळ गप्पा मारत बसलो होतो. भारतीय समकालीन कवींमध्ये अभावाने आढळणारा वास्तवदर्शीपणा त्यांच्यात होता. मार्क्सवादी विचार त्यांनी अंगीकारला, तरी त्याचा आपल्या कवितेवर त्यांनी पगडा बसू दिला नाही.''
साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी कोलकत्याहून दूरध्वनीवर सांगितले, ""विंदांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. इंग्रजीचे नको एवढे प्रस्थ वाढलेल्या आजच्या काळात विंदांचे जाणे हा भारतीय साहित्य क्षेत्राला बसलेला धक्का आहे.'' ज्येष्ठ साहित्यिक कबीर वाजपेयी यांच्या मते, ""विंदा हे अनेक गोष्टी परखडपणे मांडत असत. आदर्शवाद केवळ वाचायचा नसतो तर ती जीवनात प्रत्यक्ष अंगीकारण्याची गोष्ट आहे, हे विंदांकडे पाहून आम्हाला पटत असे.''
साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष एस. एस. नूर यांनी विंदांच्या अनेक कवितांचा पंजाबीत अनुवाद केला आहे. ""विंदा मूल्यांची मांडणी तिक्या चपखलपणे करीत की त्या कवितांना भाषेचा अडसर रहात नसे. त्यांची "दंतकथा' ही कविता तर पंजाबी साहित्य क्षेत्रातही प्रचंड लोकप्रिय झाली,'' अशी आठवणही नूर यांनी सांगितली.