Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

आवर्जून अनुभवावासा चकवा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 23, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: ranbhul,   film,   entertainment
अभिजित पेंढारकर
माणूस बुद्धिजीवी असला, तरी "मना'नं खूप विचार करतो. मनाला झालेल्या जखमा बुद्धीच्या जोरावर भरून काढण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा या भरपाईच्या नादात दुसऱ्याला जखमा देतो आणि त्याच्या स्वतःच्या जखमा तशाच भळभळत राहतात... "रानभूल' हा अशाच एका "जखमी' कलाकाराच्या आयुष्यातल्या फरपटीचा प्रवास आहे.

लोकेश साटम (सुबोध भावे) हा लहानपणापासून आई-वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेला मुलगा. त्याचं गिटारवादन वडिलांना आवडत नाही, म्हणून ते त्याला अंधाऱ्या खोलीत दिवसेंदिवस कोंडून ठेवतात. नैराश्‍यग्रस्त लोकेशला समजावण्यासाठी आजी त्याला परिकथा सांगते आणि तो त्याच विश्‍वात राहू लागतो. आपल्या "ईश्‍वरी' संगीताला नावं ठेवणाऱ्यांची आयुष्यच संपवून टाकायला सुरवात करतो. रेवा (तेजस्विनी पंडित) या मुलीच्या आयुष्यात तो अचानक येतो आणि तिच्या आयुष्यात जीवन-मरणाचा खेळ सुरू होतो...

गिरीश जोशी यांची ही कथा असून, पटकथा-संवादही त्यांनीच लिहिले आहेत. विषय वेगळा नसला, तरी तो उत्कंठावर्धक पद्धतीने मांडण्याचे श्रेय त्यांच्यासह दिग्दर्शक संजय सूरकर यांना. बेपत्ता झालेल्या एका मुलाच्या तपासाच्या बरोबरीने उलगडणारी लोकेशच्या आयुष्याची फरपट प्रेक्षकांना गुंतवून टाकते. प्रसंगांच्या माध्यमातूनच प्रेक्षकांपर्यंत पोचणाऱ्या कथेमुळे उत्कंठा कायम राहते. मध्यंतराच्या दृश्‍यानंतर ती अधिक वाढते; पण ताणलेल्या क्‍लायमॅक्‍समुळे मात्र भ्रमनिरास होतो. एका माथेफिरू, मनोविकृत खुन्याला पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आत न जाता फौजफाटा का पाठवतात, ओलिस ठेवलेल्या रेवाच्या वडिलांना कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आत जाऊ कसे देतात, लोकेश शरण आल्यानंतरही रेवाला आधी सुरक्षित स्थळी न नेता तिला शेवटी कसे ठेवतात असे अनेक प्रश्‍न पडतात. मुळात एकदा चॅटिंग करून केवळ गिटारवादन आवडले म्हणून एखादी तरुण मुलगी थेट एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी जाते, यावरच विश्‍वास बसत नाही.या चुकांकडे दुर्लक्ष केलं, तर उत्कृष्ट अभिनय आणि प्रेक्षकांना गुंतवून टाकणाऱ्या सादरीकरणाच्या जोरावर चित्रपट आकर्षक झाला आहे. सुबोध भावेच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी आणि परिपूर्ण भूमिका ठरावी. केवळ नजरेनेच समोरच्या व्यक्तीच्या आणि प्रेक्षकांच्याही काळजात चर्रर्र व्हावं, अशी कमाल त्याने साधली आहे. तेजस्विनीनंही महत्त्वाच्या भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे. मोहन जोशींनी साकारलेला चाणाक्ष पोलिस अधिकारी त्यांच्या वकुबाला साजेसा. नरेंद्र भिडे यांच्या संगीतातील सुबोध भावेनं गायलेलं शीर्षक गीत आणि त्याचा चित्रपटातील गूढ वातावरण वाढविण्यासाठीचा वापर अप्रतिम.

प्रतिक्रिया
On 6/12/2010 2:23 AM mangesh Dhamale said:
चित्रपट छान आहे....................नक्की बघा!!!!! have a good day
On 6/8/2010 10:32 AM Rohit said:
एकंदरीत चित्रपट चांगला वाटतोय .
On 6/6/2010 3:55 PM mamata said:
स्टोरी वाचून तरी चांगला असावा असा वाटतंय. बघायला पाहिजे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: