शाळाखोल्यांच्या पायाखाली आणखी एका गुरुजींचा बळी
-
Tuesday, June 15, 2010 AT 12:45 AM (IST)
केंद्राकडून येणाऱ्या निधीतून सुरू झालेल्या शाळाखोल्या बांधण्याच्या स्पर्धेत मराठवाड्यातील आणखी एका मुख्याध्यापकाचा बळी गेला आहे. पोलिस ठाण्यात सरावानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून कौडगाव (ता. जिंतूर) येथील राजकुमार नंदनवार या मुख्याध्यापकाची आत्महत्येची नोंद झालेली असली तरी ठाण्याबाहेरची परिस्थिती मात्र वेगळीच आहे. वास्तव दर्शविणारी ही परिस्थिती म्हताऱ्याप्रमाणे काठी टेकत येत असते आणि या प्रवासाला अर्थातच विलंब लागत असतो. यापूर्वीही अशा आत्महत्या झाल्या; पण प्रत्येकीच्या कपाळावर "आकस्मिक मृत्यू' असाच शिक्का बसला.
"सकाळ माध्यम समूहा'ने सर्वशिक्षा अभियानात पहुडलेल्या अजगराचे चित्र समाजासमोर आणले आणि खळबळ सुरू झाली. ती मुंबईपासून दिल्लीपर्यंत गेली. खळबळ ऐकणारे वस्तुस्थितीवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना सरकारी भाषा बोलणारा पुरावाच लागतो. तो शोधण्यासाठी जे जे काही करतात त्यातील सारेच घटक कोणत्या ना कोणत्या कारणाने बऱ्याचदा फितूर होतात. कौडगाव येथे नोकरी करणाऱ्या मुख्याध्यापकावर शाळाखोल्यांच्या बांधकामामुळे तणाव आला होता हे त्यांच्या कुटुंबीयांसह सारेच सांगत आहेत. खोल्या बांधताना खरे तर तणाव येण्याचे कारण नाही. पण, बांधकामासाठी सिमेंटबरोबरच अन्यही काही गोष्टी गावोगावी वापरल्या जातात. कोणी किती वापरायच्या आणि त्यातून काय घ्यायचे, असा अशैक्षणिक प्रश्न निर्माण झाला, की वाद वाढतो. वाद वाढला, की एखाद्या संवेदनशील माणसाचा तणावही वाढतो. या तणावावर भाष्य करता येत नाही. तो दाखवता येत नाही. "तोंड दाबून बुक्याचा मार' यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि एक दिवस ती फास शोधायला लावते. हे सारे घडते आहे, हे सरकार मान्य करणार नाही. कारण या ताणाताणीत सरकारमधील वरपासून खालपर्यंत अनेक घटक गुंतलेले असतात. ओल्या हातातच कोरड्या फायली घेऊन चौकशीचा फार्स करीत असतात. म्हातारी मरत राहते आणि काळ सोकावत राहतो. शिक्षण क्षेत्रातील महाभ्रष्टाचार संपविण्यासाठी ना सरकार, ना शिक्षक, ना समाज कधी पुढे येतो. परीक्षा, घटक चाचण्या, जनगणना, निवडणुकीतील काम आणि एकूणच अशैक्षणिक विषयांना हात घालून ऐन परीक्षेच्या वेळी बंड करणारे बहादूर गुरुजी आता कुठे आहेत कळायला मार्ग नाही. शाळेत आम्ही मूल्यशिक्षणाचा तास घेतो मूल्यहीनतेचा नाही, हे ठणकावून सांगायला ते का तयार नाहीत?
सर्वशिक्षा अभियानाचे सर्व भ्रष्टाचार अभियानात रूपांतर झाले आहे, हे सर्वप्रथम सरकार चालविणाऱ्या मायबापाने मान्य करायला हवे. तसे झाले तर दुरुस्तीचे मार्ग शोधता येतात. प्रत्यक्षात मात्र पांघरूण घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कुणी काही बोलले, लिहिले तर पुरावे घेऊन या, असे सांगितले जाते. आता वाईट अर्थाने का होईना आणखी एका गुरुजीची आत्महत्या झाली. पण, या पुराव्याला आकस्मिक मृत्यू एवढेच म्हटले जात असेल तर मग काहीच घडणार नाही. खिचडीत हळद टाकून ती मसालेदार बनविली जाते. ती कधीच विहित वजनात असत नाही, हे लाखो- कोट्यवधी विद्यार्थ्यांना कळणारे सत्य सरकारला का कळत नसावे की समजून घेण्याची त्यांची इच्छाच मेली असावी. सर्वशिक्षा अभियानाचे वाढीव वर्ष यंदा संपणार आहे. स्वाभाविकच हात धुऊन घेण्याची स्पर्धाही वाढणार आहे.
सगळ्यात अधिक पैसा बांधकामात असतो आणि त्यात वाटेकरी होण्यासाठी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. सरपंच त्यापैकी एक. अनेक ठिकाणी शाळाखोल्यांची कामे सरपंचांनी आपल्या नात्यागोत्यांच्या नावावर केली आहेत. सरपंचाच्या परवानगीशिवाय पानच हालत नसल्याने गुरुजींनाही नमते घ्यावे लागते. सरपंच म्हणजे राजकीय शक्ती असते. हीच शक्ती साऱ्याच गुरुजींवर अलीकडे देखरेख करीत असते. "तळं राखील तो पाणी चाखील', असे या देखरेखीचे रूपांतर झाले आहे. सरपंचाबरोबर अनेक गुरुजींनाही तळं चाखायची सवय लागली. ज्यांना पाणी गोड लागले त्यांचे ठीक आहे; पण ज्यांच्यावर चव उलटली त्यांची त्रेधातिरपीट उडाली. गुरुजींनी मुकाट्याने धनादेशावर सह्या कराव्यात, यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले जाऊ लागले. गुरुजी मुख्यालयात राहणार की नाही, हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा.
भ्रष्टाचाराला प्रतिबंध करता यावा आणि विविध घटकांनी परस्परांवर देखरेख ठेवावी, यासाठी एक नवी यंत्रणा तयार करण्यात आली. तिचा हेतू चांगला होता. आपल्याकडे वाईट हेतूचे निर्णय कधीच घेतले जात नाहीत. निर्णय राबविताना मात्र शुक्राचार्य जन्माला येतात आणि वाईट शेवट होतो. जे लाभार्थी असतात ते फुकट मिळते म्हणून अंमलबजावणी यंत्रणेला प्रश्न विचारत नाहीत. ते मौन पाळतात म्हणून साखळी विस्तारत जाते. एखाद्याच्या गळाचा फास बनते. खिचडी नीट शिजवावी म्हणून गुरुजींवर सरपंचांचे, सरपंचावर बाबूंचे, बाबूंवर आणखी कुणाचे तरी नियंत्रण आणले गेले. पण, तरीही प्रयोग का कुजतो आणि सडतो याची उत्तरे कारभाऱ्यांच्या भ्रष्ट मानसिकतेत शोधावी लागतील. काम कठीण असले तरी ते हातात घेण्याचे धाडस सारे लाभार्थी आणि मूल्य शिक्षणाचे धडे देणारे करणार आहेत काय?