प्रत्येक मराठी कुटुंबातील एक जण व्यावसायिक असावा - मनोहर जोशी
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 11, 2009 AT 12:00 AM (IST)
पुणे - ""मराठी माणसाला जर प्रगती करायची असेल, तर कुटुंबातील किमान एक व्यक्ती व्यवसायात पाठवू, अशी प्रतिज्ञा त्याने केली पाहिजे,'' असे मत शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
आत्मज्योत प्रकाशनाच्या "समृद्धीच्या वाटेवर,' "साई सागरातील 88 मोती,' "भवसागर नावाडी' या पुस्तकांचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. फूलगावचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, राहुल सोलापूरकर, सुरेश पद्मनाभन, लेखिका वैशाली वर्णेकर, श्रीकांत आंबेकर या वेळी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ""कोणताही माणूस श्रीमंत होऊ शकतो. मात्र, त्यासाठी व्यवसायाशिवाय पर्याय नाही. मराठी माणूस हा फार मोठे ध्येय बाळगताना दिसत नाही, तो छोट्या गोष्टींवरच समाधान मानतो. प्रगती करण्यासाठी व्यवसाय हे साधन असल्याने मराठी माणसाने नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण केले पाहिजे. मात्र, अजूनही आपली तशी मानसिकता तयार होत नाही.''
राजकारण आणि पैसा कमावणे हा माझा छंद आहे. मात्र, राजकारण आणि माझ्याकडे असलेला पैसा याचा काही संबंध नाही, अशा कोट्या करीत जोशी यांनी भाषणात रंग भरले. मुंबईत आलो तेव्हा सुरवातीच्या काळात तीस रुपये वेतनावर काम केले. इतक्या पगारात एकवेळचे जेवण मिळत असे. त्यामुळे गरिबीचा सूड घेण्यासाठीच मी व्यवसायात आल्याचे जोशी यांनी सांगितले.