Update:   IST       वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark

धान उत्पादक हादरला; ऐंशी टक्के नुकसान
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 18, 2009 AT 11:30 PM (IST)
गोंदिया - सुरवातीला कोरडा आणि त्यानंतर पडलेला ओला दुष्काळ, अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ऐंशी टक्के धान पिकाचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली. बुधवारी (ता.18) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तातडीच्या आढावा बैठकीत माहिती देताना ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल होते. यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अविनाश झाडे, आमदार राजेंद्र जैन, निवासी जिल्हाधिकारी के. एन. के. राव, अप्पर जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर व इतर संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील धान खरीप पिकाच्या नुकसानीसंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, जिल्ह्यातील एक लाख 82 हजार 631 हेक्‍टर शेत जमिनीवर भात पिकाची लागवड करण्यात आली. त्यापासून दोन लाख 19 हजार 572 मेट्रिक टन तांदळाचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु, जून महिन्यात भात पिकाच्या पऱ्ह्यांच्या लागवडीकरिता आवश्‍यक असलेला 100 मि.मी. पाऊस पडला नसल्याने पीक संकटात सापडले. त्यानंतर जुलै महिन्यात आवश्‍यकतेपेक्षा 314 मि. मी. पाऊस अधिक पडला असला तरी त्याचा उपयोग मात्र झाला नाही. तर, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आवश्‍यकतेनुसार पाऊस बरसला नाही. परिणामी 332 मि. मी. पाऊस सरासरीपेक्षा जिल्ह्यात कमी पडला. त्यामुळे शेतातील धान पीक करपले. उल्लेखनीय असे की, धान पिकाच्या उत्तम वाढीसाठी 1100 मि. मी. पावसाची आवश्‍यकता राहते. तर, यंदा मात्र, केवळ 935.9 मि. मी. पाऊस पडला असल्याची नोंद आहे. काही ठिकाणी तर जमिनीला भेगासुद्धा पडल्या होत्या. तरीदेखील शेतकऱ्यांनी पाणी वागवून धान पीक वाचविले. शेतात शिल्लक असलेल्या धान पिकाच्या आधारावर तरी घेतलेले कर्ज आणि वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन जमविण्याचा यातून त्यांनी प्रयत्न केला होता. याच आशेवर जगत त्यांनी खरीप नंतर रब्बीचीदेखील लागवड केली होती. परंतु, गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कोरड्यासोबतच ओल्या दुष्काळाचीसुद्धा चांगलीच झळ पोचली आहे. जिल्ह्यात दोन लाख 49 हजार शेतकरी असून, पैकी दोन लाख 27 हजार शेतकरी या नैसर्गिक आपत्तीने बेजार झाले असल्याची माहिती श्री. चंद्रिकापुरे यांनी दिली.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: