Update:   IST       वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark

16 रुग्णांनी घेतला हिस्टेरेक्‍टॉमी सर्जरीचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 19, 2009 AT 11:30 PM (IST)
Tags: vidarbha,   health

गडचिरोली - चातगाव येथील "सर्च' संस्थेच्या मॉं दंतेश्‍वरी रुग्णालयात 14 व 15 नोव्हेंबरला गर्भाशयाच्या सर्जरीचे शिबिर पार पडले. गर्भाशयाशी संबंधित त्रास असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील 16 महिला रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

गर्भाशय पूर्णपणे बाहेर येणे, गर्भामध्ये गाठी होणे, मासिक पाळी प्रमाणापेक्षा जास्त जाणे अशा विविध समस्या या रुग्णांमध्ये असतात. या समस्येवर मात करण्यासाठी हिस्टेरेक्‍टॉमी सर्जरीची गरज असते; परंतु अनेक महिला भीतीपोटी ऑपरेशन करण्यास धजावत नाही. विशेषत: आदिवासी महिलांमध्ये ही भीती मोठ्या प्रमाणात दिसून येते. ती घालविण्यासाठी "सर्च' गावपातळीवर आरोग्य तपासणीचे शिबिरही अनेकदा घेत असते. नुकतेच 12 नोव्हेंबरला दराची व खरकाडी या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेतले असता दराची येथील एका महिलेला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. कॅन्सरच्या भीतीपोटी ही महिला स्वत: शिबिरासाठी तर आलीच; शिवाय जास्त मासिक पाळी जाण्याचा त्रास असलेल्या अन्य दोन महिलांनाही शिबिरात आणले. या तिन्ही आदिवासी महिलांना सर्जरी शिबिराचा लाभ घेता आला. शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील डॉ. आशिष कुबडे, भूलतज्ज्ञ डॉ. सत्कार पवार, डॉ. संदीप मेश्राम, तसेच सहकारी श्‍याम दुरुगकर, लीलाधर दमाहे हे तज्ज्ञ आले होते. सर्व रुग्णांना पुढील सात दिवस ऑपरेशननंतरच्या काळजीकरिता मॉं दंतेश्‍वरी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुषमा देशमुख, डॉ. पवन पाटील, नंदा सुर्वे, विशाखा नगराळे, जयवंता कुमाटी, वर्षा लाडे, करिश्‍मा उसेंडी, लता मडावी, अनुप गायकवाड, कुमार स्वामी आदींनी सहकार्य केले.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: