Update:   IST       वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark

पोतदार खूनप्रकरणी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 21, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: marathwada,   parbhani,   crime,   court

परभणी - पाथरी पंचायत समितीच्या तत्कालीन बालविकास प्रकल्प सहायक अधिकारी शांताबाई पोतदार यांच्या खूनप्रकरणी बुधवारी (ता. 19) श्रीशैल भगवानराव वामन व अजित अशोकराव गर्जे यांना जिल्हा न्यायाधीश श्रीमती सरलादेवी आयरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तसेच प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावला आहे.

श्रीमती शांताबाई शशिकांत पोतदार या पंचायत समितीच्या क्वार्टर्समध्ये एकट्याच राहात होत्या तर त्यांचे कुटुंबीय कळंब येथे वास्तव्यास असे. एकट्याच असल्यामुळे त्या शेजारच्या मुलींना घरी झोपायला बोलवत. 24 जानेवारी 2008 रोजी त्या दीपाली पितळे, मीरा केदार व दीपाली शिंदे या मुलींसह क्वार्टरवर जात असताना श्रीमती पोतदार यांच्या कार्यालयाचे झेरॉक्‍सचे काम करणारा श्रीशैल वामन त्यांना भेटला. त्यांनी त्यास बजेट आल्याचे सांगून झेरॉक्‍सचे बिल बनविण्यासाठी क्वॉर्टरवर येण्यास सांगितले. रात्री श्रीमती पोतदार बैठकीत काम करीत होत्या तर आलेल्या मुली दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. श्रीमती पोतदार यांनी वामन यास बजेट आल्याचे सांगितल्यामुळे व मोठी रक्कम घरात असणार हे समजून रात्री 11 च्या सुमारास वामन व त्याचे मित्र अजित गर्जे, गुड्डू औताडे रक्कम लुटण्याच्या उद्देशानेच श्रीमती पोतदार यांच्या घरात घुसले. बैठकीत बसलेल्या पोतदार यांना काही समजण्याच्या आतच त्यांनी धारदार चाकूने सपासप वार केले. वार वर्मी लागल्यामुळे पोतदार या जागीच ठार झाल्या. श्रीशैल वामन याच्या पायालाही जबर मार लागला. त्याला नंतर गर्जे याने दुचाकीवरून मानवत येथील सरकारी रुग्णालयात नेले. त्यानंतर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पाथरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन फौजदार एन. एम. ठोंबरे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुभाष देशमुख हट्टेकर यांनी 14 साक्षीदार तपासले. श्रीमती पोतदार यांच्यासमवेत झोपण्यासाठी गेलेल्या मुलींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले शस्त्र, त्यांच्या अंगावरील कपडे व परिस्थितीजन्य पुरावा हा आरोपींविरुद्ध जातो, असा युक्तिवाद देशमुख यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीश सरलादेवी आयरेकर यांनी श्रीशैल वामन व अजित गर्जे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: