गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 21, 2009 AT 12:00 AM (IST)
नांदूर घाट - जिल्हा परिषदेच्या स्थानिक विकास निधीतून करावयाच्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी येथील एका युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
या बाबत माहिती अशी - जिल्हा परिषदेच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांसाठी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केज तालुका भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रमुख दीपक मोराळे यांनी केला होता. तसेच यातील दोषी उपविभागीय अभियंता गालफाडे यांना निलंबित करावे, अशी मागणी केली होती. 15 नोव्हेंबरपर्यंत चौकशी न झाल्यास 17 तारखेला जिल्ह्यात कुठेही व कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
प्रशासनाने याची दखल न घेतल्याने श्री. मोराळे यांनी मंगळवारी (ता. 17) नांदूर घाट येथील पोलिस चौकीत अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. श्री. मोराळे यांना प्रतिबंधक उपायासाठी तालुका न्यायदंडाधिकारी केज यांच्यासमोर उभे करण्यात आले असता, त्यांना समज देण्यात आली, अशी माहिती सहायक फौजदार दिलीप नानेकर, पोलिस जमादार उबाळे यांनी दिली.