
वॉशिंग्टन - पाकिस्तानने भारताबरोबर नव्याने बोलणी करण्यास पुढे यावे, असे अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या बरोबर डॉ. सिंग यांची शिखर परिषद होत आहे. परिषदेच्या पूर्वसंध्येला डॉ. सिंग यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचीही आठवण करून दिली.
परराष्ट्र मंडळात बोलताना पंतप्रधानांनी भारत आणि अमेरिकेत विविध वस्तू, सेवांसाठी खुली अर्थव्यवस्था मजबूत व्हायला हवी, असे सांगितले.
भारत-पाकिस्तान संबंधाबद्दल ते म्हणाले, भारताला आशिया खंडात शांतता हवी आहे. भारताने पाकबरोबर संबंध सुधारण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. परंतु, पाककडून तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. पाकिस्तानने आता बदलायला हवे. दोन्ही देशातील नागरिकांना शांततेने जीवन जगता यावे, अशी भारताची अपेक्षा आहे.