नक्षलवाद्यांकडून कंत्राटदाराची गोळ्या झाडून हत्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 25, 2009 AT 11:45 PM (IST)
गडचिरोली - तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या इरुपढोढरी गावाजवळ नक्षलवाद्यांनी मंगळवारी (ता. 24) रात्री सात वाजताच्या सुमारास उमेश विश्वनाथ भिवापुरे (वय 30) या युवा कंत्राटदाराची गळा चिरून व गोळ्या झाडून हत्या केली. ते गडचिरोली येथील रामुपरी वॉर्डातील रहिवासी होते. कंत्राटदाराची हत्या करण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, भिवापुरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ व पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह आणण्यास केलेल्या टाळाटाळ केली म्हणून कंत्राटदार व नागरिकांनी आज (ता. 25) दुपारी भिवापुरे यांचा मृतदेह इंदिरा गांधी चौकात आणून पोलिसांच्या विरोधात घोषणा देत रास्तारोको आंदोलन केले. तब्बल तीन तासांच्या आंदोलनानंतर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर सायंकाळी शोकाकुल वातावरणात भिवापुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमेश भिवापुरे या कंत्राटदाराचे धानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याचे व पुलाचे काम सुरू होते. भिवापुरे मंगळवारी (ता. 24) येरकड-इरुपढोढरी रस्त्याच्या पाहणीसाठी गेले होते. दरम्यान, संध्याकाळी सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांचे लोकांसमक्ष अपहरण केले. त्यानंतर तब्बल पाच किमी अंतरावर नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी उमेशने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर धारधार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली. आज सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत उमेश भिवापुरे यांचा मृतदेह घटनास्थळीच पडून होता. मात्र, पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर भिवापुरे यांचे नातेवाईक व कंत्राटदारांनी स्वत: मृतदेह गडचिरोलीत आणला. घटनास्थळी उमेश यांच्या खिशात व कंबरेत नक्षलवाद्यांनी ठेवलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या. यात उमेश भिवापुरे हा पोलिस गुप्तवार्ता विभागासाठी काम करीत असून, मुन्नासिंग ठाकूर यांचा खास माणूस आहे, ठेकेदारीच्या नावावर त्याने नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याचा प्रयत्न चालविल्याने आम्ही त्याची हत्या केल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात धानोरा तालुक्यातील येरकड येथील शिंपी नामक दिवाणजीची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. शिंपी हे उमेश भिवापुरे यांचे विश्वासू सहकारी होते, अशी माहिती पुढे आली असून, आर्थिक देवाण-घेवाणीतून या दोघांचीही नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचे समजते. कंत्राटदाराची हत्या करण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
गुरुवारी (ता. 19) सकाळी साडेदहाच्या सुमारास धानोरा तालुक्यातील दुधमाळा-महावाडा रस्त्यावर गडचिरोली येथील नागेरेड्डी चिंचरेड्डी या कंत्राटदाराची खंडणीसाठी नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडून 50 हजार रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल आदी वस्तू लंपास केल्या होत्या. तसेच, शनिवारी (ता. 21) रात्री आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील वनविभागाच्या खसरा डेपोला आग लावली होती. यात सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले होते.
उमेश भिवापुरे या कंत्राटदाराची हत्या झाल्यामुळे येथील कंत्राटदारवर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, भिवापुरेंचा मृतदेह आणण्यास पोलिसांनी नकार देऊन विचारणा करण्यास गेलेल्यांना "तुम्हीच मृतदेह पोलिस स्टेशनला आणा', असे सुनावले. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी दुपारी साडेतीन वाजता रास्तारोको आंदोलन केले. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती होती. तत्पूर्वी आंदोलकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयापुढे रस्ता अडविला. त्यानंतर आंदोलक इंदिरा गांधी चौकात आले. मृतक भिवापुरे यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका भर रस्त्यात ठेवून कंत्राटदारांनी चक्काचाम आंदोलन केले. गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, आंदोलकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांशिवाय कुणाशीही चर्चा करण्यास नकार दिला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. या आंदोलनामुळे सुमारे तीन तास प्रमुख मार्गाची वाहतूक बंद होती.
आज गडचिरोली बंद
नक्षलवाद्यांचा अत्याचार व पोलिसांची निष्क्रियता यामुळे संतप्त कंत्राटदारांनी गुरुवारी (ता. 26) गडचिरोलीतील बाजारपेठ, शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, आठवडाभरात घडलेल्या दोन घटनांमुळे कंत्राटदारांत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.