भारतीय विद्यार्थ्यांवर ब्रिटनमध्ये बेरोजगारीची कुऱ्हाड
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 03, 2009 AT 12:00 AM (IST)
लंडन - "कमवा आणि शिका' योजनेद्वारा भारतातील खेड्यापाड्यातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले जात आहे. गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रातही क्रांती झाली. भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी झेप घेतली. तेथे शिक्षण घेताना अर्ध वेळ नोकरी मिळत असे. आता मात्र चित्र काहीसे बदलले आहे. ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या हाताला काम नसल्याने, अनेक विद्यार्थी मातृभूमीकडे परतत असल्याचे चित्र आहे.
"कमवा व शिका' सूत्राच्या आधारे उच्च शिक्षण पूर्ण करू पाहणाऱ्या ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ज्यांचे पालक शिक्षणाचा खर्च देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना तेथे भाड्याने घर घेणे व खाणावळ लावणेही अवघड होऊन बसले आहे. काही विद्यार्थ्यांनी साऊथहॉल येथील गुरुद्वाराचा आश्रय घेतला आहे. तेथे जेवण मोफत असल्याने व काही दिवस राहण्याची व्यवस्था होत असल्याने, विद्यार्थ्यांचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्येवर "बीबीसी'ने प्रकाशझोत टाकला आहे. नितीन वालिया या विद्यार्थ्यांने सांगितले, की त्याने भाड्याने खोली घेण्याचा प्रयत्नच केला नाही. बसप्रवासासाठी नातेवाइकांकडून तो पैसे उसने घेतो. खर्च भागविण्यासाठी त्याला नोकरी करणे भाग आहे. श्री गुरुसिंग सभेचे अध्यक्ष दीदारसिंग रंधवा म्हणाले, ""आज शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना आम्ही दररोज अन्न देतो; मात्र, विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करू शकत नाही. आमची संस्था त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहते. त्यांच्या रोजगारासाठी "हेल्पलाइन' सुरू केली असून, नोकरीसाठी कुठे अर्ज करावयाचा, याचे मार्गदर्शनही करण्यात येते.''
व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या रवी सिंग याने सांगितले, की परदेशात आम्हाला पाठविताना भारतातील एजंट मंडळी येथे नोकरीचे आश्वासन देतात; परंतु, येथील वास्तव तसे नाही. आमची फसवणूक झाल्याचे येथे आल्यावर कळते. दरम्यान, "गड्या आपला देश बरा' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.