सुपर स्पेशालिटी रुग्णालये आरोग्य विद्यापीठाला जोडणार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 06, 2009 AT 12:00 AM (IST)
नाशिक - आज वैद्यकीय शिक्षण महाग झाले आहे. आदिवासी भागात अद्यापही डॉक्टरांची उणीव भासत आहे. उपचारासाठी, साधा एक्स-रे काढण्यासाठी नागरिकांना मैलोन् मैल पायपीट करावी लागते. त्यामुळे राज्यातील सुपर स्पेशालिटी व तत्सम रुग्णालये आरोग्य विद्यापीठाशी जोडून त्यात समांतर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे प्रतिपादन प्र-कुलपती, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षण- प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा कोनशिला समारंभ आणि वैद्यकशास्त्राच्या इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. मृदुला फडके, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव व्ही. एल. ढोले, आमदार डॉ. वसंतराव पवार, व्यवस्थापन समितीचे प्र-कुलसचिव डॉ. सुनील फुगारे, डॉ. शशांक दळवी, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. मानसिंग पवार, डॉ. देशमुख, डॉ. देसाई, डॉ. रावराणे, डॉ. कांडेकर उपस्थित होते.
डॉ. गावित म्हणाले, की सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमधून अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पोचविण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय शिक्षण देताना आज दर्जेदार शिक्षणाचा अभाव दिसून येत आहे. काळानुसार प्राध्यापकांनी आपले ज्ञान वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना संशोधनाचा गांभीर्याने विचार करून त्याला चालना देणे काळाची गरज आहे. मात्र, आजच्या पिढीतील डॉक्टरांमध्ये प्रात्याक्षिकांचा अभाव आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आवश्यक नसून, सामाजिक जाणिवेतून रुग्णांशी संबंध कसे असावेत, हे त्यांना शिकविण्याची गरज आहे. त्याचबरोबर वेळोवेळी वैद्यकशास्त्रातील संशोधन, अवघड शस्त्रक्रिया यांबाबत त्यांना प्राध्यापकांनी मार्गदर्शन करावे.
प्राध्यापकांनीही आपले ज्ञान वाढविण्यासाठी ज्येष्ठ, अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आता प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या भागातील नागरिकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे शासनाकडून बंधनकारक केले जाणार आहे. त्याचा उपयोग सार्वजनिक आरोग्यासाठी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी होणार आहे. आरोग्य विद्यापीठातर्फे बांधण्यात येणाऱ्या टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, लायब्ररी, अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असतील. वेळोवेळी शासनाकडून त्यासाठी मदत केली जाणार आहे. राज्यातील शासनाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये समांतर वैद्यकीय अभ्यासक्रम व तत्सम कोर्स सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. वसंतराव पवार यांनी टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय संशोधनाला चालना देण्यासाठी संशोधन विभाग तयार करावा, अशी सूचना मांडली. दरम्यान, सर्व मान्यवरांनी वैद्यकीय वस्तुसंग्रहालयाची पाहणी केली. यातील उपकरणे, भित्तिपत्रके, शिल्पांचे मंत्रिमहोदयांनी कौतुक केले. संग्रहालय तयार करण्यासाठी मोलाचे योगदान करणाऱ्या आदिती वैद्य, निखिल वैद्य, प्रा. एन. डी. विचारे, प्रा. सायनेकर, डॉ. अभय चौधरी, डॉ. संगीता अंबोरे, डॉ. मानसिंग पवार, भारतीय नौदलाचे सर्जन कमांडर डॉ. कुशिलाब बोस, डॉ. कुलदीप शर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. प्र-कुलसचिव डॉ. फुगारे यांनी आभार मानले.
"सहावा वेतन आयोग लवकरच लागू करू'
सहाव्या वेतन आयोगासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. या प्रकरणी आज मंत्री डॉ. गावित यांना विचारले असता, लवकरच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.