(संतोष भिंगार्डे)
तिचं स्वप्न काही वेगळंच होतं... डान्स टीचर बनून अनेक तरुणींना तिला नृत्याचे धडे द्यायचे होते... आपल्या इशाऱ्यावर अनेक तरुणींना नाचवायचं होतं.
तिच्या नशिबात मात्र दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार काम करायचं असंच लिहिलेलं होतं आणि तस्संच झालं! डान्स टीचर बनू पाहणारी स्नेहा वाघ अभिनेत्री बनली!!
अभिनेत्री व्हायचं असं स्नेहाने अजिबातच ठरवलेलं नव्हतं. तिचा कल होता तो नृत्याकडे. त्यातच मास्टरी करायची असं तिने ठरवलं होतं. कल्याणच्या बिर्ला कॉलेजात अकरावीत असताना तिला "मांगल्याचं लेणं' या नाटकात "क्लासिकल डान्स' करायचा आहे म्हणून ऑफर आली. कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी वगैरे नृत्यांचे प्रकार स्नेहा शिकत होती. आता तिला आपलं कौशल्य रसिकांपुढे सादर करण्याची संधी चालून आली हाती. आनंदात स्नेहा तिथे गेली, पण...
"तिथे गेल्यानंतर तुम्हाला पार्वतीची भूमिका साकारावी लागेल, असं मला सांगण्यात आलं,' स्नेहा सांगते. "आधी मी त्यांना "नाही' सांगितलं. खरंच अभिनयात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण ही भूमिका वेगळी होती. ही व्यक्तिरेखा नृत्य करणारी होती आणि नृत्याबरोबर संवादही म्हणायचे होते. राजन बने त्याचे दिग्दर्शक होते. शेवटी नाही नाही म्हणत मी होकार कसा दिला हे माझं मलाच कळलं नाही. बस्स! तिथेच माझं नशीब पालटलं.'
"मांगल्याचं लेणं'नंतर स्नेहाला "खंडोबाचं लगीन'ही मिळालं आणि ही नाटकं करीत असतानाच मालिकांच्या ऑफर्स यायला लागल्या. "अधुरी एक कहाणी', "काटा रुते कुणाला', "जीवलगा' या मालिका स्नेहाने केल्या. सध्या तिची "एनडीटीव्ही इमॅजिन'वर "ज्योती' मालिका चालू आहे. त्यात ती मुख्य भूमिका साकारत आहे.
स्नेहा म्हणते, "माझ्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरला "काटा रुते कुणाला'... जवळजवळ अडीच वर्षं मी त्या मालिकेशी बांधली गेले होते. गावोगावी लोकप्रिय झाले होते. कुठेही गेलं तरी त्याचा प्रत्यय येई. गावातल्या महिला मला भेटायला यायच्या, माझी ओवाळणी करायच्या. ते अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही.'
"मला "ज्योती'ची ऑफर आली तीही अचानकच. आजवर मी मराठीत काम केलं होतं, हिंदीत नव्हते आले कधी. हिंदी मालिका करायची तर हिंदी सफाईदारपणे बोलणं आवश्यक होतं. ती भाषा नीट कशी बोलली जाईल, उच्चार स्पष्ट कसे होतील हे मी पाहिलं. त्यासाठी मेहनत घेतली. आपल्याला जबाबदारीने काम केलं पाहिजे, याची जाणीव मला पहिल्यांदा इथे झाली.'
"चिंगी' या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून स्नेहाने काम केलंय. तिचा "गृहलक्ष्मी' नावाचा चित्रपटही आलेला आहे. आता गिरीश मोहिते दिग्दर्शित "बे दुणे साडेचार' हा विनोदी चित्रपट येत आहे. नानूभाई जयसिंघानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मोहन जोशी, संजय नार्वेकर, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, अतुल परचुरे, सुशांत शेलार, रेशम टिपणीस, उदय सबनीस अशी स्टारकास्ट आहे. स्नेहा पहिल्यांदाच विनोदी चित्रपट करते आहे. "बे दुणे...'मध्ये स्नेहाने तनुजाची भूमिका साकारली आहे. अत्यंत लाडाकोडात वाढलेली श्रीमंत बापाची ही मुलगी असते; मात्र तिचं प्रेम ज्या मुलावर बसतं, त्याच्या वडिलांचं आणि तनुजाच्या वडिलांचं वैर असतं. त्यामुळे लग्न अशक्यच! पुढे...? ते प्रत्यक्ष पडद्यावर! मात्र स्नेहाला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.