Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

विकास प्रक्रिया गतिमान; पण देश मागास - डॉ. नरेंद्र जाधव
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 16, 2009 AT 12:15 AM (IST)

कोल्हापूर - नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर विकासाची प्रक्रिया गतिमान झाली; पण योग्य धोरणांच्या अभावी काही बाबतींत देश अजूनही खूपच मागे असल्याची खंत केंद्र शासनाच्या नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सर्व काही आलबेल आहे, असे समजण्याची गरज नाही; पण महासत्ता बनण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास त्यात निश्‍चित यश मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन करण्याची जबाबदारी नियोजन आयोगावर असते. आठ सदस्यांमध्ये इतक्‍या वर्षात प्रथमच मराठी माणसाला संधी मिळाली. प्रत्येक सदस्याला वेगवेगळे विषय आणि वेगवेगळी राज्य दिली जातात. त्या सदस्यांने देशपातळीवर त्याला दिलेल्या विषयासंबंधी आणि राज्यपातळीवर सर्व विषयावर नियोजन करणे अपेक्षित असते. आपल्याकडे शिक्षण (केजी टू पीजी), तांत्रिक कौशल्य, सामाजिक न्याय असे विषय असून बिहार, तमिळनाडू, गोवा आणि दिवदमण असे क्षेत्र दिले आहे. नियोजन आयोगातील सदस्यांवर पक्षीय वर्चस्व असत नाही. कोणत्याही राज्याने आयोगाच्या धोरणांची अमंलबजावणी केली नाही, तर त्यांच्यावर अंकुश ठेवता येतो. अकरावा वित्त आयोगाच्या नियोजनाचा मध्यावधी आढावा या वेळी प्रथमच डिसेंबर किंवा जानेवारी 2010 मध्ये घेण्यात येणार असून, बाराव्या वित्त आयोगाचे काम मार्च 2010 पर्यंत पूर्ण झालेले असेल.''

राज्यात वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता असल्यानेच विविध समित्यांवर महाराष्ट्रीय माणसांना संधी दिली असून, ते योग्य पद्धतीने काम करत असल्याचे सांगून ते म्हणाले, 'नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर देशाने काही बाबतीत प्रगती केली. त्यामध्ये विकासाचा दर वाढला. दारिद्य्र रेषेखालील लोकांची संख्या घटली आणि परदेशी चलनाची गंगाजळी वाढली. एकेकाळी भारताला दर सात वर्षांनी आयएमएफकडे कर्ज मागायची वेळ यायची आता भारत अल्पप्रमाणात का होईना आयएमएफला कर्ज देत आहे. देशाचा आत्मविश्‍वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.

आमचा बाप.... आता कोरीयन भाषेत
डॉ. नरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे आतापर्यंत 17 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. हे पुस्तक आता कोरीयन भाषेत आले आहे. मराठी भाषेत या पुस्तकाने विक्रम केला असून, आतापर्यंत दिड लाख प्रती खपल्या. कोरीयन भाषेतही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून पंधरा महिन्यांत एक लाख 90 हजार प्रती खपल्याचेही त्यांनी सांगितले.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: