Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

विचारप्रवर्तक विज्ञानपट मून
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 19, 2009 AT 06:29 AM (IST)
Tags: movie,   moon

'मून' या चित्रपटाची गणना "परिपूर्ण विज्ञानपट'मध्ये करता येईल. दिग्दर्शक, पटकथाकाराने विषयाच्या वैचारिक बाजूकडे वेधलेले लक्ष, ही या चित्रपटाची जमेची बाजू. दर्दी प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट आहे.
- गणेश मतकरी


हॉलिवूडमध्ये गंभीरपणे केलेला, प्रत्यक्ष वैज्ञानिक संकल्पनांचा आधार असलेला आणि "स्पेशल इफेक्‍ट्‌स'ना कथेसाठी पूरक म्हणूनच वापरणारा विज्ञानपट (सायन्स फिक्‍शन) किती दुर्मिळ आहे, हे तर आपण जाणतोच. आर्थर सी क्‍लार्क लिखित आणि स्टॅन्ली कुब्रिक दिग्दर्शित "2001  : ए स्पेस ओडीसी' ही चांगल्या विज्ञानपटांची सुरवात होती; पण लवकरच जॉर्ज ल्युकसने आपल्या "स्टार वॉर्स' मालिकेतून विज्ञानपटांची संकल्पनाच बदलून टाकली आणि विज्ञानपटांचा वापर केवळ करमणूक अन्‌ नेत्रदीपक दृश्‍यांचा वापर करण्याची संधी म्हणून केला जाऊ लागला. त्यातच त्यांना "ऍक्‍शन थ्रिलर्स' (इन्डीपेन्डन्स डे, वॉर ऑफ द वर्ल्डस्‌), बालपट (ट्रान्सफॉर्मर्स मालिका), भयपट (इव्हेन्ट होरायजन, एलिअन मालिका) अशा इतर चित्रप्रकारांबरोबरदेखील नियमितपणे जोडण्यात यायला लागले आणि चांगल्या विज्ञानपटाकडून काय अपेक्षा ठेवावी, हेच प्रेक्षक विसरून गेले.

मला तीन चांगले विज्ञानपट आठवले. पहिला अर्थातच "2001', दुसरा स्टॅनिस्लाव लेमच्या कादंबरीवर आधारित स्टीवन सोडरबर्गने केलेला "सोलारिस'चा रिमेक (पहिला तारकोवस्कीने केल्याने हॉलिवूडच्या हद्दीबाहेर होता.), तिसरा कार्ल सेगानच्या कादंबरीचे चित्रप्रारूप असलेला रॉबर्ट झेमेकिसचा "कॉन्टॅक्‍ट'. या तिघांमधील उघड साम्य आहे, ते या तिन्ही कलाकृती मोठ्या विज्ञानकथालेखकांच्या कादंबऱ्यांवर आधारित आहेत. साहजिकच त्यातले विज्ञान हे पडद्यावरच्या चमत्कारांसाठी सबब म्हणून वापरलेले नाही, तर त्यात काही एक विचार गेलेला आहे आणि त्या त्या दिग्दर्शकांनी हा विचार आपल्या सादरीकरणातही शाबूत राहील, याची पुरेशी काळजी घेतलेली आहे.

विज्ञानपटांबद्दल असे पुराण लावण्याचे कारण म्हणजे याच वर्षी प्रदर्शित झालेला "मून'. हा चित्रपट तसा पूर्णपणे हॉलिवूडचा म्हणता येणार नाही. कारण अमेरिका आणि इंग्लंड यांनी एकत्रितपणे केलेली ही निर्मिती आहे. पण इंग्रजी व्यावसायिक चित्रपटांच्या वर्गात मात्र तो निश्‍चित मोडतो. "मून'चा दिग्दर्शक आहे- डन्कन जोन्स. जोन्सच्या गोष्टीवरूनच नेथन पार्कने त्याची पटकथा लिहिलेली आहे. "मून' भारतात अजून प्रदर्शित झालेला नाही. आपल्या वितरकांचे हिशेबी उद्योग पाहता, तो होईल असे वाटत नाही. त्यात ना अवकाशात लढली जाणारी युद्धे आहेत, ना अद्ययावत यंत्रांनी केलेली नासधूस, ना भविष्यातले नेत्रदीपक देखावे, ना सांकेतिक नायक- नायिकांच्या थक्क करून सोडणाऱ्या कारवाया. खरे तर सांकेतिक म्हणण्याजोगे त्यात काहीच नाही. त्यात प्रामुख्याने केवळ दोन पात्रे आपल्याला पडद्यावर दिसतात आणि दोन नटांचे आवाज ऐकू येतात. मात्र याचा अर्थ, या दोन नटांनी या दोन व्यक्तिरेखा वठवल्या आहेत असे मात्र नाही.
 
पडद्यावरच्या दोन्ही व्यक्ती या सॅम रॉकवेलने उभ्या केल्या आहेत. मात्र तिसरी महत्त्वाची भूमिका आहे ती गर्टी या यंत्रमानवाची (बहुधा 2001 मधल्या हॅलवरून स्फुरलेली, मात्र तुलनेने हा फार माईल्ड मॅनर्ड म्हणता येईल). गर्टीचे अस्तित्व हे फारसे मानवसदृशदेखील नाही. त्याचा मूड दाखवणारे हे एक बोजड यंत्र आहे, जे इकडे तिकडे फिरू शकते. त्याचा एक यांत्रिक हातदेखील कधी कामाला येतो. मात्र त्याला व्यक्तिमत्त्व मिळते, ते त्याच्या आवाजाने. "सायको'मधल्या नॉर्मन बेट्‌सच्या आईपासून "2001'च्या हॅलपर्यंत केवळ आवाजातून उभ्या राहिलेल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांमध्ये गर्टी ही मोलाची भर आहे. इथे आवाज आहे, तोही परिचित केविन स्पेसीने दिलेला.

चंद्रावरील प्रवास
"मून' घडतो तो चंद्रावर. सुरवातीला देण्यात येणाऱ्या पार्श्‍वभूमीवरून लक्षात येते, की नजीकच्या भविष्यकाळात पृथ्वीचा ऊर्जेचा साठा उपलब्ध करून देण्यात चंद्र एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे. तिथे एक तळ उभारण्यात आला आहे. या तळावर एकुलता एक माणूस आहे, तो म्हणजे सॅम बेल (सॅम रॉकवेल). त्याच्या सोबतीला आहे तो गर्टी यंत्रमानव. सॅमला लागेल ती मदत करण्याचे त्याचे काम आहे.

सॅमची तळावरची नेमणूक आहे, ती तीन वर्षांपुरती. आता हा काळ संपत आला आहे. दोन आठवड्यांत तो परत निघू शकतो. मात्र हा काळदेखील त्याला दमवणारा ठरला आहे. एकटेपणाने आणि घरच्यांच्या आठवणीने सॅमला भास व्हायला लागले आहेत. अशाच एका भासादरम्यान त्याच्या चांद्रवाहनाला अपघात होतो. त्यातून त्याची सुटका करणारा वेगळा कोणी नसून स्वतः सॅमच असतो. मात्र हा दुसरा सॅम थकलेला नसतो, आणि हा ताजातवाना असतो, काही वर्षांनी तरुण वाटणारा. या नव्या सॅमला म्हणे तळावर येऊन आठवडाभरच झालेला असतो. आणि जुन्या सॅमबद्दल तोही संभ्रमात पडलेला असतो. गर्टी मात्र या विषयावर स्पष्ट काही बोलणे टाळतो. मग होणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण काय? सॅमला होणारा हा सगळा भास आहे, का नवा सॅम हा क्‍लोन आहे? नवा सॅम जर क्‍लोन असेल, तर जुना सॅमदेखील क्‍लोन असू शकतो. एखाद्या खऱ्याखुऱ्या सॅमवरून फारच वर्षांपूर्वी बनवलेला असू शकतो. परिस्थिती अधिकच बिकट बनते, ती पृथ्वीवरून काही संशोधकांना घेऊन येणाऱ्या यानामुळे. हे यान पुढच्या काही तासांत चंद्रावर पोचेल हे नक्की. दोघा सॅमपुढे आता या रहस्याची उकल सोडवणे गरजेचे होऊन बसते, तेही विशिष्ट वेळात. आणि वेळ तर फार थोडा उरलेला!

थ्रिलर आणि क्‍लोन
'मून'च्या मध्यवर्ती कल्पनेबद्दल बोलायचे, तर त्यात "थ्रिलर' आहे हे उघड आहे. एक मूळ व्यक्ती, एक तोतया, त्यातले खरे कोण, याचा उलगडा आणि तो शोध लावताना पटकथेने गतिमान होत जाणे, अखेरीला एक मोठा संघर्ष उभा करणे, ही वाट दिग्दर्शक/ पटकथाकाराने स्वीकारली असती, तर हा बऱ्यापैकी नेहमीचा चित्रपट बनला असता. मात्र इथले प्रश्‍न विज्ञान अन्‌ तत्त्वज्ञानाला अधिक महत्त्व देणारे आहेत. "आर्टिफिशियल इन्टेलिजन्स' किंवा "क्‍लोनिंग' यामधून भविष्यकाळात बदलत जाणाऱ्या मूल्यात्मक संकल्पना. अस्तित्वात असणे किंवा जिवंत असणे याची काय व्याख्या असावी? मेंदूला जाणवणाऱ्या संवेदना हेच अंतिम सत्य असेल, तर माणूस आणि क्‍लोन यांमध्ये भेदभाव कसा करावा, असे तत्त्वज्ञानात मूळ असणारे, पण संभाव्य भविष्यकाळापर्यंत आपला आवाका विस्तारणारे प्रश्‍न "मून'च्या पटकथेत अभिप्रेत आहेत. देकार्तचे अस्तित्वाविषयीचे प्रश्‍न किंवा पुढल्या काळात "ब्रेन इन अ वॅट थिअरी'वर झालेले काम ज्यांच्या वाचनात आले असेल, त्यांना या चित्रपटाच्या बांधणीत हे विचार निश्‍चित जाणवतील; पण प्रत्यक्ष या प्रश्‍नांची ओळख नसणाऱ्यांनाही या व्यक्तिरेखांमार्फत त्यांचे अस्तित्व जरूर जाणवेल.

दिग्दर्शक किंवा पटकथाकार यांनी जाणूनबुजून या विषयाच्या वैचारिक बाजूकडे वेधलेले लक्ष आणि केवळ थरारावर प्रेक्षकांना पैसे वसूल करून घेण्याची संधी नाकारणे, हा माझ्या मते "मून'चा विशेष आहे.

विचारांबाबत श्रीमंत असल्यामुळे "मून'चे दृश्‍य बाजूकडे दुर्लक्ष झाले आहे, असे मात्र नाही. चंद्रावरची तळाबाहेर घडणारी दृश्‍ये किंवा अवकाशतळाच्या आतील वातावरण या सर्वांमध्ये यथायोग्य परिणाम करण्याची क्षमता आहे. काही दृश्‍य योजना आणि संगीताचा वापर यावर "2001' चा असणारा परिणाम जाणवण्यासारखा आहे. तो अन्‌ गर्टी यामुळे दिग्दर्शक जोन्स "2001' ने प्रभावित असणार, हे वेगळे सांगायला नको. प्रमुख पात्राचे पुनरुज्जीवन हे सोलारिसमधेही असल्याने तोही प्रभाव नक्कीच असेल. मात्र हे प्रभाव चिकटवलेले किंवा नकलेच्या स्वरूपात आलेले नाहीत. दिग्दर्शकाच्या या कलाकृतीवर असणाऱ्या प्रेमातून नकळत आलेला, किंवा "2001' च्या काही जागांबाबत मूळ चित्रपटाची आठवण जागवणारा त्यांचा वापर आहे.
"मून' आपल्याकडे उगवेल याची खात्री देता येणार नाही, पण दर्दी प्रेक्षकांनी तो जरूर पाहावा.
 
(साभार-साप्ताहिक सकाळ)

Madhu Milan


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: