वीज जोडणीसाठी पंधरा वर्षांची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 21, 2009 AT 12:00 AM (IST)
कोल्हापूर - विहिरीवर वीजपुरवठा मिळावा यासाठी ग्राहक काशिनाथ आबा कुणकेकर यांनी अर्ज करून पंधरा वर्षे झाली. अपेक्षित तपासण्या होऊन विहिरीवर वीजपुरवठा मात्र मिळाला नाही. वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराच्या नमुण्यामुळे हताश झालेले कुणकेकर यांनी आता कायदेशीर मार्गाने दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.
कुणकेकर यांनी दिलेली माहिती अशी, नंद्याळ (ता. कागल) येथे राज्य ग्रामीण कृषी व ग्रामीण विकास बॅंकेकडून कर्ज घेऊन विहीर खोदली. त्याचे कर्जही फेडले तेथे वीज पुरवठा घेण्यासाठी मंडळाकडे अर्ज केला 2 नोंव्हेबर 1995 ला परवानगी मिळाली. त्यानंतर 17 जुलैला 2007 ला आवश्यक त्या तपासण्या होऊन जोड देण्याबाबत सकारात्मक शेराही मिळाला. त्यानंतर कुणकेकर यांनी स्वतःच्या खर्चाने वाहतूक करून तीन खांब आणले. मात्र, ते आजअखेर उभे केले नाहीत. विहीर खोदली तेव्हा कुणकेकर यांचे वय 33 होते. आता 57 झाले आहे. कुणकेकर यांचे हेलपाटे अद्यापही सुरू आहेत; पण प्रत्यक्षात वीजपुरवठा न मिळाल्याने कुणकेकर हवालदिल झाले आहेत.
वीज ग्राहकांना कायदेशीर बाबीची माहिती देऊन वीज ग्राहकांमध्ये जागृती करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या आर. के. नगर येथील सोमेश्वर शिंगे यांच्याशी संपर्क साधून कुणकेकर आता कायदेशीर मार्गाने वीज कंपनीकडे दाद मागत आहेत.