Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जे गांधींना जमले नाही, ते 'ग्रंथाली'ने पूर्ण केले!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 26, 2009 AT 12:00 AM (IST)

मुंबई - 'महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचे जे काम महात्मा गांधींना जमले नाही, ते काम ग्रंथालीने पूर्ण केले. येथील ब्राह्मण आणि दलित समाजातील मोठी दरी ग्रंथालीच्या माध्यमातून कमी होण्यास मदत झाली आहे. या कार्याचे सर्व श्रेय दिनकर गांगल यांना जाते', असे मत ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.

'गांगल 70 आणि ग्रंथाली 35' या विशेष ग्रंथाचे प्रकाशन आज दादर येथे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर, उपराकार लक्ष्मण माने, अनुराधा गांगल आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. ग्रंथाली चळवळीला 35 वर्ष पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ आणि गांगल यांच्या सत्तरीनिमित्त ग्रंथाली व कीर्ती महाविद्यालयाच्या वतीने "वाचकदिन' व "कृतज्ञतादिन' साजरा करण्यात आला. गांगल यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.

या वेळी गांगल यांचा डॉ. अभय बंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व एक लाख 10 हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. बंग यांनी या वेळी गांगल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, गांगल यांनी दलित समाजातील व्यथा, वेदना, भाषा आणि चालीरीती महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम केले. हे काम थोडेथोडके नाही तर फुले आणि आगरकर यांनी केलेल्या कामाच्याच तोडीचे आहे, या शब्दांत त्यांनी गांगल यांचा गौरव केला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

ग्रंथ प्रकाशनासाठी 50 कोटी
सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त साहित्य क्षेत्रासाठी एक विशेष योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत सारस्वत बॅंकेमार्फत अप्रकाशित ग्रंथांच्या प्रकाशनासाठी 50 कोटी रुपये कर्जस्वरूपात देण्यात येणार आहेत. येत्या 10 वर्षांनंतर ही रक्कम 100 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा मानस ठाकूर यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे हे कर्ज फक्त एक टक्का इतक्‍या कमी व्याजदराने दिले जाणार असल्याने ग्रंथचळवळीतील अनेकांना याचा लाभ होईल.
Madhu Milan
प्रतिक्रिया
On 06/01/2010 10:53 swaty.thakar@gmail.com said:
अभिनंदन ! जीवेत शरद शतम!!


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: