जुन्याच दराने पोषण आहाराचे अनुदान वाटप
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 01, 2010 AT 11:00 PM (IST)
चामोर्शी - जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून, भाजीपाल्याचेही दर गगनाला भिडले आहेत. मात्र, शाळांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेचे अनुदान जुन्याच दराने मिळत असल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणे शाळांसाठी अडचणीचे होत आहे. शालेय पोषण आहारासाठी जुन्याच दाराने अत्यल्प अनुदान प्राप्त होत असल्याने कमी विद्यार्थीसंख्या असणाऱ्या शाळांची कुचंबणा होत असून, दर नव्याने निर्धारण करून वाढविण्याची मागणी अनेक खासगी व जि. प. प्राथमिक शाळांनी केली आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण थांबविणे, आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांचे कुपोषण होऊ नये यासाठी केंद्र शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेचे अनुदान जिल्हा परिषदेमार्फत संबंधित शाळांना देण्यात येते. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना खिचडी व भातभाजी असा आहार मधल्या सुटीत दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 100 ग्रॅम तांदूळ व इतर खर्चाकरिता प्रतिविद्यार्थी 2.25 पैसे याप्रमाणे रक्कम दिली जाते. त्यातून शाळांना लागणारे जळाऊ इंधन, स्वयंपाकी, तेल, तिखट, मीठ मसाला, डाळ, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागतात. परंतु, हा दर मागील अनेक वर्षांपूर्वीचा आहे. यावर्षी तेल, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू आणि मजुरीचे दर वाढल्याने पोषण आहाराची मिळणारी रक्कम अपुरी पडत असून, आहार पुरविणे अडचणीचे ठरत आहे. त्यासाठी शासनस्तरावर महागाईनुसार नवीन दर निर्धारित करून प्रतिविद्यार्थी पाच रुपये याप्रमाणे पोषण आहाराच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी शाळांकडून होत आहे.