मीच इडियट.., विधु विनोद चोपडांची माफी
वृत्तसंस्था
Saturday, January 02, 2010 AT 04:38 AM (IST)
नवी दिल्ली - पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारावर खेकसलेले 'थ्री इडियटस्' चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोपडा यांनी अखेर शनिवारी संबंधित पत्रकाराची माफी मागितली. 'माझ्या हातून चूक झाली आहे. सदर प्रश्नावर मला राग आला होता, मात्र अशाप्रकारे खेकसणे योग्य नव्हते. त्यामुळे मी त्या पत्रकाराची माफी मागतो,' असे ते म्हणाले.
शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एका पत्रकाराने चोपडा यांना 'थ्री इडियटस्ची' कथा चेतन भगत यांच्या पुस्तकाशी मिळतीजुळती आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर चोपडा यांनी खेकसत आपण ते पुस्तक वाचले आहे का, असा प्रतिप्रश्न केला.
परिषदेला उपस्थित असलेल्या आमीर खानने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, सदर पत्रकाराची माफी मागावी, असे चोपडा यांना सांगितले. परंतु, चोपडा यांनी माफी मागण्यास नकार दिला.
शनिवारी सदर पत्रकाराची माफी मागताना ते म्हणाले, 'की पत्रकार परिषदेचे चित्रण पाहिल्यानंतर मला माझी चूक लक्षात आली. त्यानंतर मी पत्रकाराची माफी मागण्याचा निर्णय घेतला.' पण, त्याच वेळी भगत यांनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा असून त्याचा त्यामागील हेतू चुकीचा होता, असेही ते म्हणाले.