स्थळ - शिधापत्रिका कार्यालय, जळगाव
दिनांक - २ जानेवारी २०१०
वेळ - सकाळी साडेअकरा
जळगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील शिधापत्रिका कार्यालय. नवीन शिधापत्रिका घेण्यासाठी आणि जुन्या पत्रिकांचे नूतनीकरण करण्यासाठी कागदपत्रे कार्यालयाबाहेर शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी दोन्ही खिडक्यांवर लांबच लांब रांगा लावलेल्या. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय. काही तान्ह्या बाळासह रांगेत उभ्या. एवढ्यात जळगावातील समतानगर भागातील दहा- बारा महिलांचा घोळका येऊन थेट पुरवठा विभागाच्या एस. पी. पाटील या अधिकाऱ्यांच्या दालनाकडे जातो. "आम्ही हाफीस उघडल्यापासून इकडून तिकडे फिरत आहोत. दोन तास झाले. आमची गोठ कोणीच घेत नाही. साडेदहाची वेळ दिली होती. आता कार्ड घेतल्याबगर आम्ही जाणार नाही' असे म्हणत त्या कार्यालयात गदारोळ सुरू करतात. तेवढ्यात साहेबांचा एक तथाकथित "कार्यकर्ता' येऊन महिलांवर खेकसतो. "साडेदहाची वेळ दिली म्हणजे काय बॉंडपेपर लिहून दिला का? चला निघा बाहेर.' परंतु महिला त्याचे ऐकत नाहीत. त्यामुळे नरमाईने घेत कार्यकर्ता म्हणतो, "मावशी मी स्लिपा तयार झाल्या, की मी तुम्हाले सांगतो. तुम्ही झाडाखाली बसा.' काही महिला विचारतात, "भाऊ मागे शंभर दिले. आता परत पन्नास दिले. आणखी किती पैसे देनं पडतील?' त्यावर तो म्हणतो, "तुमचा मोबाईल नंबर द्या, काम झालं की मी रिंग करतो.' त्यातील काही महिला त्याला घरच्या कोणाचा तरी नंबर देतात. तो हळूच त्यांच्या कानाशी कुजबुजतो. चार महिला प्रत्येकी पन्नासची नोट काढून देतात आणि कार्यकर्ता पुन्हा आत जातो...
दुपारी दीडची वेळ. बाहेरगावाहून येणाऱ्या ग्रामस्थांची वर्दळ वाढली असते. अर्ज भरण्यापासून तो साहेबांकडे सादर करण्यापर्यंत सर्व काही करण्याची तयारी दाखविणारे "कार्यकर्ते'ही ग्राहकांच्या शोधात फिरत असतात. मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील एका वयोवृद्ध महिलेचा अर्ज एक जण भरून देत असतो. "सही येत नाही' असे तिने सांगताच तो क्षणाचाही विलंब न करता स्वतःच इंग्रजीतून सही ठोकतो व ७०० रुपये खर्च येईल असे सांगतो. ती आपल्याकडे शंभरच रुपये असल्याचे सांगते. त्यावर तो म्हणतो, "मधीबी देनं पडतं. नाही तर बस आठ महिने फेऱ्या मारत. आता शंभर रुपये दे. माया मोबाईल नंबर लिखले अन् सोमवारी मले भेट.' तसे ती करते. तो लगेच शिधापत्रिका कार्यालयाच्या खिडकीजवळ पोचतो. नशिराबादच्या दोन बुरखाधारी महिलांपुढे जाऊन "फॉर्म भरना है क्या?' असं विचारत पुन्हा आपला उद्योग सुरू करतो...
थोड्या वेळाने जळगावच्या कांचननगरातील अशोक श्रीधर सोनवणे एक तक्रार घेऊन येतात. नवीन शिधापत्रिकेच्या जागी "कौटुंबिक पुरवठा पत्रिकेची पुरवणी' असा एक छोटा कागद दिला जात असतो. शिधापत्रिका पुस्तिका कुणालाच मिळत नाही आणि पुरवणी पत्रिकेवर रेशन दुकानदार अन्नधान्य देत नाही, अशी तक्रार ते करतात. पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ते दखल घेत नसल्याचे सांगत असतात...
दुपारी साडेतीनला गर्दी थोडी कमी होते. चहापानासाठी कार्यालयातील कर्मचारी बाहेर जातात. अर्धा होऊनही ते येत नाहीत. तोपर्यंत पुन्हा रांग वाढते. एक लिपिक बाहेर येतो. त्याच्या हातात कुणाची तरी कागदपत्रे असतात. एक जण लगेच पुढे येतो. लिपिकाच्या इशाऱ्यावरून कार्यालयाच्या मागच्या दाराकडे जातो. तिकडे आधीपासूनच पाच-सहा जण शिधापत्रिकांवर शिक्के मारत असतात. तेवढ्यात एकजण आतून भांडत बाहेर येतो. "पैशे दिले तर अतिरेक्यानलेबी दी टाकाल आन् आमच्यासारख्या माणसाले फिरवाल. संध्याकाळ होत आली तरी फिरवाफिरव...' त्याचा संताप पाहून लगेच गर्दी जमते. तातडीने चार कार्यकर्ते येऊन त्याची समजूत काढतात. जळगाव तालुक्यातल्या भोकर येथील हा ग्रामस्थ असल्याचे समजते.
सायंकाळी पाचला कार्यालयातील कर्मचारी घरी परतण्याच्या तयारीत असतात. त्यावेळीही रांगेत उभ्या असलेल्यांना "आता सोमवारी या' असे सांगत ते निघून जातात. सकाळपासून "गिऱ्हाईक' शोधणारे कार्यकर्तेही चहाच्या टपरीकडे वळतात.