संवेदनशील मनातील कविता रसिकाला खरा आनंद देते
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 22, 2010 AT 12:52 AM (IST)
पुणे - ''डोळ्यांतील कुतूहल, निर्भय, संवेदनशील मनातून प्रत्येक पायरी चढत होणारा कवितेचा प्रवास हा रसिकाला खरा आनंद देणारा ठरतो,'' असे प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी गुरुवारी येथे सांगितले.
अनमोल प्रकाशनच्या वतीने औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि कवी राजन लाखे यांनी रचलेल्या "मी पाहिलेला सूर्य' या काव्यसंग्रहाचे आणि "मनातले माझ्या' या चारोळ्यांचे प्रकाशन दवणे यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. अभिनेते राहुल सोलापूरकर, गायक शौनक अभिषेकी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
दवणे म्हणाले, ''अभियंते असून श्री. लाखे यांनी जीवनाच्या सर्व घटकांना स्पर्श करीत केलेल्या कविता या अनुभवसंपन्न आणि मनाला भावणाऱ्या ठरल्या आहेत. यापुढेही श्री. लाखे यांनी काव्य जगातील प्रवास चालू ठेवून आपल्या कलंदर व्यक्तिमत्त्वाची जाणीव समाजाला करून द्यावी.''
सोलापूरकर म्हणाले, ""वाचन संस्कृतीची उतरंड चालू असताना मनाचे स्पंदन काव्यात्मक रूपाने मांडून लाखे यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे.'' अभिषेकी यांनी लाखे यांच्या कवितांची प्रशंसा केली आणि त्यावर गायला मला आवडेल, असेही नमूद केले. काव्य क्षेत्रातील वाटचालीसाठी यशवंत देव, मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभल्याचे लाखे यांनी नमूद केले. प्रकाशक नरेंद्र नांदुरकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. अनमोल प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त साहित्यप्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. दिलीप पांगारकर यांनी आभार मानले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले.