
इस्लामाबाद - 14 जानेवारी रोजी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पाकिस्तानातील "तेहरिक-ए-तालिबान' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद ठार झाल्याचा दावा आज "पीटीव्ही'ने केला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत आमच्याकडे खात्रीशीर माहिती नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
दक्षिण वझिरीस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेच्या ड्रोनने दहशतवाद्यांना लक्ष्य केले असून काही दहशतवाद्यांना ठार करण्यात यशही आले आहे. ड्रोन हल्ल्यात मेहसूद हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा सासऱ्यांच्या घरात मृत्यू झाला. त्याच्यावर मामुंझाई भागात अंत्यसंस्कारही करण्यात आले, असे वृत्त स्थानिक सूत्रांच्या आधाराने "पीटीव्ही' या वृत्तवाहिनीने दिले आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी पत्रकारांना सांगितले, की मेहसूद हा ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे खात्रीलायक वृत्त सरकारकडे नाही. तो ठार झाला आहे की जिवंत आहे, याची माहिती आम्ही घेत आहोत. "पीटीव्ही'ने मेहसूद ठार झाल्याचे वृत्त स्थानिक सूत्रांच्या आधारानेच दिले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दहशतवाद पाकिस्तानला जडलेला कॅन्सर आहे आणि त्याचा समूळ नायनाट केल्याशिवाय आम्हाला मोकळीक मिळणार नाही, असे त्यांनी शेवटी सांगितले. अंतर्गत जनसंपर्क कार्यालयानेही मलिक यांच्याच सुरात सूर मिसळला असून मेहसूद ठार झाल्याबद्दलचे वृत्त आपल्या विभागाकडे नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तालिबानच्या सूत्रांनी मेहसूद ठार झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तो अजूनही अज्ञातस्थळी असल्याचा दावा केला आहे. मेहसूद याला अमेरिकन ड्रोनने लक्ष केले होते व त्याच्यावर हल्ला झाला होता, असे पाकिस्तानातील गुप्तचर खात्याने म्हटले आहे. तर मेहसूद ठार झाल्याचे वृत्त अजूनही आपल्याकडे नसल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.