
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आपल्या बहिणीसाठी योग्य वर शोधतेय असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही बुचकळ्यात पडाल किंवा स्वतःला योग्य पती शोधण्याऐवजी तब्बू आपल्या बहिणीसाठी वर का शोधतेय, असा उलट प्रश्नही विचाराल. परंतु "तो बात पक्की' या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटातील तिच्या बहिणीसाठी अर्थात उविका चौधरीसाठी ती योग्य वर शोधणार आहे. या चित्रपटाद्वारा तब्बूचे हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या खंडानंतर पुनरागमन होत आहे. "तो बात पक्की' या चित्रपटाच्या कथानकानुसार तब्बूची बहीण उविकाला योग्य वर मिळावा यासाठी ती प्रयत्न करीत असते. नुकतेच बिग ९२.७ एफएम या रेडिओ वाहिनीच्या स्टुडिओत दिग्दर्शक जय शेवाक्रमानी तसेच तब्बू, शर्मन जोशी, वत्सल सेठ हे कलाकार "तो बात पक्की'च्या "प्रमोशन'साठी आले होते. त्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तिने तितक्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. ती म्हणाली, की या चित्रपटातील माझी बहीण उविकाला योग्य वर आपण शोधणार आहोत. तो चांगला, प्रामाणिक आणि नोकरी-व्यवसाय करणारा असावा, असे माझे प्राथमिक निष्कर्ष आहेत. बाकी अन्य गोष्टी आता सांगणे उचित ठरणार नाही. आपल्या लग्नाबाबत तिला विचारता तिने अजून काही ठरविलेले नाही. ते ठरले की सर्वांना सांगेन, असे मोजक्या शब्दात उत्तर दिले. या चित्रपटाविषयी ती म्हणाली, की या चित्रपटाची कथा आपल्याला कमालीची भावली. तत्पूर्वी काही चित्रपट ऑफर झाले होते; परंतु मला ते पसंत पडले नाहीत. मात्र हा चित्रपट चांगला बनलेला आहे.