
नवी दिल्ली - महात्मा गांधींवरील उत्कृष्ट चित्रपट म्हणून "रोड टू संगम'ची वाखाणणी होत असून, गांधी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यरत असलेले "गांधी पीस फाउंडेशन' (जीपीएफ) हा चित्रपट प्रत्येक भारतीयापर्यंत पोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे. यासाठी देशातील गांधीवादी संस्थांना या चित्रपटाच्या सीडी देणार असल्याची माहिती "जीपीएफ'च्या अध्यक्षा राधा बहन यांनी दिली.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या राधा बहन "रोड टू संगम' चित्रपटाबद्दल म्हणाल्या, की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पुरस्कार केलेल्या अहिंसा, सत्याग्रह, सामाजिक सलोखा या तत्त्वांचा पुरस्कार या चित्रपटात करण्यात आला आहे. बदलत्या जागतिक पार्श्वभूमीवर, गांधींजींच्या तत्त्वज्ञानाची उपयुक्तता अधिकच जाणवत असून, दिग्दर्शक अमित राय आणि निर्माते अमित छेडा यांनी महात्मा गांधींचा संदेश जनमानसापर्यंत परिणामकारकरीत्या पोचविण्याचे काम केले आहे.
"रोड टू संगम' हा अलीकडच्या काळात गांधी विचारांवर निघालेल्या गल्लाभरू आणि करमणूकप्रधान चित्रपटांप्रमाणे नाही. यातून खऱ्या अर्थाने गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार होत असल्याने मोठ्या जनसमूहापर्यंत हा चित्रपट पोचावा, यासाठी "गांधी पीस फाउंडेशन' या चित्रपटाच्या सीडी देशभरातील सर्व गांधीवादी संस्थांमार्फत लोकांपर्यंत पोचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
"रोड टू संगम' काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून, व्यावसायिक प्रदर्शनापूर्वी गांधीवादी नेत्यांसाठी दिल्लीमध्ये चित्रपटाचा खास खेळही दाखविण्यात आला होता. चित्रपटात परेश रावल, ओम पुरी, पवन मल्होत्रा, जावेद शेख, स्वाती चिटणीस, मसूद अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुधीर नेमा यांनी गीते लिहिली असून, संदेश शांडिल्य, नितीनकुमार गुप्ता, प्रेम हरिया आणि विजय मेहरा यांनी संगीत दिले आहे.