ना. धों. महानोरकवी मंगेश पाडगावकर हे या पन्नास वर्षांत आपल्या कवितेनं रसिकांच्या मनात पक्क घर करून बसलेले भाग्यवान कवी आहेत. त्यांची प्रेमकविता, भावकविता, निसर्ग, सटायर, वात्रटिका, भावगीतं, बालकविता, भाषांतरित कविता इ. बहुविध आयाम घेऊन आलेली त्यांची कविता मराठी भाषेला खूप काही देऊन गेली. म्हणून तर "दूरस्थ' खेड्यातून आलेल्या माझ्यासारख्या कवीनं त्यांवर नितांत प्रेम केलं आणि त्यांच्यावर, त्यांच्या कवितेवर प्रेम असल्यामुळेच थोडंसं लिहावसं वाटलं. गेल्या आठवड्यात संगमनेर या गावी बालकुमार साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांनी जी खंत व्यक्त केली, अस्वस्थता दाखविली, त्यामुळे साहित्यिकच नव्हे तर अनेक क्षेत्रांतले नीट विचार करणारे लोक, रसिक खूप नाराज झाले. "जनस्थान', "साहित्य अकादमी', "महाराष्ट्र भूषण' अशी दहापेक्षा अधिक त्यांना मिळालेल्या बहुमोल मोठ्या सन्मानाची यादीच त्यांनी सांगितली. त्यातून किती किती लाख रुपये मिळाले, त्याचे आकडे सांगितले. बहुमान, अध्यक्षपदं सांगितली. हे सगळं असलं तरी भारत सरकारचा "पद्म' पुरस्कार आपल्याला मिळाला नाही. परवाही यादीत नाव नाही याची खंत व्यक्त केली. त्यांना मी एवढा मोठा लायक कवी कसा दिसत नाही असं नुसतं न म्हणता ज्यांना ज्यांना "पद्म' पुरस्कार मिळाले ते किती लायक आहेत व त्यांना "ते कसे मिळतात हे मला चांगलं ठाऊक आहे. कशाला सांगायला लावता?' अशी खदखद त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केली. अनेकांनी फोन केले. एकानं तर मला त्यांच्या आवाजातला हा टेपच फोनवर ऐकवला तेव्हा मला खरंच ते बोलले हे पटलं आणि मीही खूपच अचंबित झालो, खूप अस्वस्थताही आली.

साहित्यिकाला किंवा कोणत्याही कलावंताला कितीही मोठे पुरस्कार मिळाले तरी त्याचा खरा सर्वोच्च पुरस्कार हा रसिकांच्या मनात त्यांच्या हृदयात त्याच्या शब्दांचे जे कर असतं. निर्मळ निस्सीम प्रेम असतं- "ऐसी कळवळ्याची जाती लाभाविना जडे प्रीती' हे असतं. त्यापेक्षा मोठं काहीही नाही, असं मी समजतो. पुरस्कार तसे आज त्यांच्या मोठेपणाचे मिळायलाच हवे. ते अधिकाधिक साहित्यिकांना मिळायला हवेत आणि मिळताहेत. खूप मोठमोठ्या प्रतिभावंत लेखक कवींना "पद्म' पुरस्कार मिळालेले नाहीत म्हणून त्यांचं मोठेपण थोडंसुद्धा कमी झालेलं नाही हे आपण पाहतोच आहोत. "पाडगावकरांना मिळायला हवं' असं रसिकांनी कुठे लिहिलं, बोललं तर ते आनंददायी आहे; पण आपणच आपली वखवखलेली भूक अशा पद्धतीनं मांडणं हे आपणच आपल्याला खाली आणण्यासारखं, अहंकारी आहे. लक्ष्मणशास्त्री जोशी, पु. ल. देशपांडे, कविराज कुसुमाग्रज, दि. भि. कोलते, विजय तेंडुलकर, यू. म. पठाण, नामदेव ढसाळ, कुमार केतकर यांसारख्या लेखकांना, कवींना "पद्म' पुरस्कार मिळालेले आहेत. "कोणाला कसे मिळालेत हे मला नीट ठाऊक आहे' असं वाक्य वापरून त्यांचा, मराठी भाषा साहित्याचा व राष्ट्रपतींच्या सहीनं त्यांच्या हस्ते भारताच्या वतीनं भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकाला हे दिले जातात. त्यांचा अवमान होत नाही का? अगदी सामान्य माणसंसुद्धा आज बोलताना "शहाणपण' ठेवून बोलतात. आदरणीय बाबा आमटे, गोविंदभाई श्रॉफ यांसारखी निस्सीमपणानं आपल्या कार्याला आयुष्य वेचून त्यांचा आदर्श घेऊन सन्मानित अशी दहा-वीस नावं सर्व क्षेत्रांतल्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यादीत आहेत. त्यात संगीत, समाजसेवा, आरोग्य, संशोधन असं खूप आहे. म्हणजे त्यांनीसुद्धा प्रयत्नपूर्वक हे मिळविलं, असं म्हणता येईल का? खूप साहित्यिक कलावंत आहेत त्यांना मिळायलाच हवं, ते कधी बोलत नाहीत, बोलणारही नाहीत. मेधा पाटकर, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव, माधवराव चितळे, पाषाणातून पाझर निर्माण करणारे, खडकाळ प्रदेशात उभं राहून आयुष्यभर अन्नाचा घास देणारे, देश जगवणारे किती तरी शेतकरी आहेत, संशोधक आहेत त्यांनाही मिळायलाच हवं; पण ते कधीच स्वतः बोलणार नाहीत एवढे परिपक्व आहेत. पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत. महाराष्ट्र-मुंबई ही भारताची सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची राजधानी आहे आणि एकापेक्षा एक उंचीचे अथक परिश्रमाचा ध्यास घेऊन आयुष्य वेचणारे जमिनीवर पाय असलेले थोर लोक आहेत. म्हणूनच देशातला "पद्म' पुरस्कारांचा वाटा नेहमीच इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला अधिक असतो. तो एकट्या महाराष्ट्राला किती वाढवता येईल? त्याला काही मर्यादा व नियम आहेत. एक निःपक्षपाती, सुजाण, पारदर्शी अशी चाळणी, चाळणीतून जाणारी सक्रिय व्यवस्था तिथे असते. त्यातून पाडगावकरांसारखे कवी कधी येतीलही; पण जे बोलले ते औचित्याला धरून खासच नाही. हे मला फोन करणाऱ्यांचं, चॅनेल्स व पेपर्सचं म्हणणं आहे. मला सांगतात "तुम्ही यावर लिहायला हवं बुवा!' तुम्ही का लिहीत नाही?
पाडगावकरांनी आता हिमाचल प्रदेश, नागालॅंडसारख्या प्रदेशात जाऊन राहावं म्हणजे ते लवकर मिळेल आणि "पद्म' पुरस्कार कोणाला कसे मिळतात हे त्यांना ठाऊक आहेच. तो माहीत असलेला मार्ग फार तर आता त्यांनी स्वीकारावा. कारण त्यांची अस्वस्थता आता खूपच वाढलीय. ती कमी होईल. संगमनेरला ते पुन्हा असं म्हणाले, की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मी बिनविरोध घेतलं. मतांचा "जोगवा' मागून इतर अध्यक्ष होतात त्यातला भीक मागणारा मी नाही. 10 जून या दिवशी औरंगाबादला अ. भा. साहित्य महामंडळाची बैठक आयोजित केलेली होती. त्यात दुसऱ्या विश्व साहित्य संमेलनासाठी काही नावं येताहेत त्यांचा विचार करून त्यातून सर्वानुमते अध्यक्ष ठरवू असं ठरलं होतं. घटनेनुसार रीतसर मीटिंग 10 जूनला व्हायच्या आधीच 9 जूनला स्वतः पाडगावकरांनीच महाराष्ट्रातल्या सर्वच प्रसिद्धी माध्यमांना ""मी विश्वसाहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो'' असं जाहीर केलं. ते सर्वत्र जोरदार छापून, तसंच चॅनेल्सवर आलं आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी खूप अस्वस्थपणानं अंगावर सगळे झेल घेऊन सांगितलं, की "अजून बैठकच झालेली नाही, चर्चाच नाही तर ते अध्यक्ष कसे होऊ शकतात?' हे अगदीच सत्य आहे तर याचीसुद्धा व्यूहरचना व लाचावलेपण इतक्या घाईने करून पदरात पाडून घेण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे महामंडळ बदनाम झालं आणि लोकांच्या मते- पाडगावकरसुद्धा. आणि तरीही इतरांच्या निवडून आलेल्या अध्यक्षपदाला "जोगवा' व "भीक' म्हणावी याच्याइतकी घसरण कुणाची मी पाहिली नाही.
कवी मंगेश पाडगावकर यांना "महाराष्ट्र भूषण' हा सर्वोच्च अगदी मानाचा पुरस्कार देऊन गौरविले. त्याचा आम्हाला किती आनंद व अभिमान वाटला. मी त्यांना फोन केला; पण जळगावी त्यांच्या मुलाखतीच्या भेटीत गुलाबपुष्प देऊन नमस्कार केला. असं अनेकांच्या परी अनेकांना आनंददायी इतर मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, नाशिक, जळगाव अगदी थेट माजलगावपर्यंत पाडगावकर यानंतर फिरते राहिले. मुलाखती, कविता वाचन केलं. सन्मान स्वीकारले. (ऐकायला येत नसलं तरी मुलाखतकार बोलतात आणि हे तिसरंच सांगताहेत हेही हास्यास्पद रसिकांनी पाहिलं.) त्याची तक्रार नाही. ऐंशीव्या वर्षी ते हे करताहेत हे नवलाचं वाटलं. त्यापेक्षाही प्रेमापोटी रसिक किंवा संस्था बोलावतात. आपला ग्रेट कवी त्यांनी किती किती पैसे व कशासाठी एवढे मागावेत, कशासाठी अतिरिक्त सोयी व "व्यवस्था' पाहिजे? सत्कार व मुलाखतीचेही किती पैसे शेवटी देता येतील, मर्यादा आहेत आणि सगळंच न पेलवणारं, तरीही प्रेमी व भाबडे रसिक खूप प्रेम करताहेत. रत्नागिरीला एक वर्षापूर्वी चौथे जल साहित्य संमेलन थाटात झाले. त्याचे ते अध्यक्ष होते (पहिल्या जल साहित्य संमेलनाचा नागपूरला मी अध्यक्ष होतो. हे सगळे "पाणी' क्षेत्रात चांगले काम करणारे ध्येयवादी लोक आहेत) उशिरा रेस्ट हाऊसमधून येण्यापासून तर भाषण आणखी काही अमर्याद बेशिस्तीचं विचारूच नका, असे सांगताना माझ्याजवळ खूप लोक वैतागलेले होते. साहित्यिकांविषयी, कलावंतांविषयी आजही समाजात सर्वत्र खूप खूप आदरभाव आहे. तुमचे पाठ, कविता, त्यातले विचार समाजाला पुढे नेत असतात. या सगळ्या प्रकारांनी, वागण्या बोलण्यामुळे एकूणच साहित्य विश्वाचं अवमूल्यन थोडंफार नाही का होत. त्यांना कोणी सांगावं? लहान तोंडी तूर्त एवढंच. यापेक्षा पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा लिज्जत पापड फोडलेलाच आहे.