पुनर्जन्माचे मनोरंजन
-
Friday, February 05, 2010 AT 08:28 PM (IST)
(पुरुषोत्तम आबुज)
सध्या एका दूरदर्शन वाहिनीवर पुनर्जन्मावर आधारित एक "मनोरंजनाचा' कार्यक्रम दाखवला जातो. पुनर्जन्म या विषयावर कुणाचा विश्वास असो अगर नसो; परंतु या कार्यक्रमातील गोष्टी नक्कीच अविश्वसनीय आहेत.
या कार्यक्रमात सहभागी झालेले जाणून घेतात की पूर्वजन्मी ते कोण होते, त्यांचा मृत्यू कसा झाला, वगैरे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही माहिती अत्यंत तपशीलवार असून, कार्यक्रमाची संचालिका सदर व्यक्तीस पूर्वजन्माचे कुठले वर्ष त्यास आठवत आहे, ते वाळूवर बोटाने रेखाटण्यास सांगते. मला तर कुमार गंधर्वाच्या "ऋणानुबंधाच्या...' गीतातील ".... वाळूत मारल्या रेघा' याची आठवण होते.
असो, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने त्याचे पूर्वाजन्माचे वर्ष १५१४ असे रेखाटले. १५१४ मध्ये राजस्थानातील एका गावात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याला आठवले. १५१४ हे इंग्रजी कॅलेंडरमधील वर्ष त्यास आठवले खरे; पण ही इंग्रजी कालमान पद्धत घेऊन इंग्रज त्यानंतर शेकडो वर्षांनी भारतात आले. मग त्याला आधीच १५१४ हे इंग्रजी कॅलेंडरमधील वर्ष कसे आठवले कोण जाणे! कदाचित राजस्थानच्या या जन्माआधीचा त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असावा आणि इंग्रजी कालमान पद्धत त्याने न चुकता आठवणीत ठेवली असावी.
पुनर्जन्म ही संकल्पना जर खरी असेल तर लोकसंख्येत बेसुमार वाढ का होत आहे, हे मला कधीच कळले नाही. पुनर्जन्मावर जर असे कार्यक्रम दाखवण्यात आले, तर जीवन संपले तरी पुढे आपल्याला परत जन्म मिळेल असा ग्रह धरून आत्महत्येचे प्रमाण वाढणार नाही का? आपल्या प्रसारमाध्यमांकडे जर शिल्लक वेळ असेल तर त्यांनी लोकांचे पूर्वजन्म आणि भविष्य जाणून घेण्याचा खटाटोप करण्यापेक्षा काही वेळ त्यांच्यासाठी खर्च करावा, ज्यांचे वर्तमान जीवन असह्य झाले आहे.