Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पौष्टिक केळफूल
मालविका करकरे
Monday, February 08, 2010 AT 05:17 PM (IST)
Tags: banana flower,   fruit,   mejwani,   food,   recipes

केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे.

हिरव्यागार लांबच लांब केळीच्या बागा, त्यामध्ये लोंबणारे केळीचे लोंगर व त्याला लागलेली गुलाबीसर कोंबाप्रमाणे पुढे आलेली फुले! खरंच मन मोहून जातं. आपण आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो.
बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे. परंतु, त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत.

केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल रंगाची फुले येतात व त्यांचे रूपांतर केळीत होते. केळ्याच्या एका घडात 300 ते 400 केळी तयार होतात. चंपाकदली, अमृतकदली, मर्त्यकदली, माणिक्‍य कदली, लोटण, वेलची केळी, चंपाचिनी इत्यादी केळीच्या मुख्य जाती आढळतात. याशिवाय रंगभेदावरूनही केळीच्या जाती ठरतात.

केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये, वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताजे, फॉर्म स्वरूपाचे निवडावे. केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. मोठ्या केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात.


आहार हेच औषध 

केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते.

 केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून ऍनिमियामध्ये उपयुक्त.

 इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते.

 केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रावाचा जास्त त्रास होत नाही.

 जास्त रक्तस्राव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो.

 केळफुलात जीवनसत्त्व "क,' "अ,' "ब,' "के' फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते.

 केळफूल म्हणजे रेषायुक्त घटकांचा (ऋळलशीी) चा उत्तम स्रोत आहे, म्हणून अन्नपचनास उपयोग. बद्धकोष्ठता टळते.

 ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी.

 स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे.

 भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही.

 आतड्यांचा, स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आहारात केळफूल घ्यावे.

 केळफुलाचा केशरयुक्त भाग कापून त्यात मिरपूड भरून ठेवावी व सकाळी ते केळफूल तुपात तळून खावे. त्याने श्‍वासविकार लवकर बरा होतो, असे वर्णन आयुर्वेदात केले आहे.

 सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम. बलवृद्धीसाठी उपयुक्त.

 केळफुलाचा अनेक पौष्टिक, नावीन्यपूर्ण पदार्थ करण्यास उपयोग होतो. त्याचा स्वाद आपण आहारात घ्यावा. असे पौष्टिक, विविध गुणधर्म असलेले, जीवनसत्त्वयुक्त, रेषायुक्त केळफूल आहारात वेगवेगळ्या चवीने जरूर खावे.

केळफुलाचे कटलेट
साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, 4-5 चमचे तेल, 1 मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड - 2 स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ.

कृती : चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे. गोल चपटे कटलेट तव्यावर तेल टाकून खमंग भाजावेत व गरम गरम सर्व्ह करावेत. बरोबर सॉस अथवा हिरवी चटणी छान लागते. चविष्ट , फायबरयुक्त, करण्यास सहज सोपा पदार्थ.

केळफुलाची भाजी
साहित्य : केळफूल निवडून चिरून, अर्धी वाटी बारीक चवळी (कडधान्य) 8-10 तास भिजवून, ओले खोबरे, कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरून, चिंच, मीठ, धने-जिरे पूड, फोडणीसाठी तेल, मोहरी, लाल ओली मिरची 2, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, गूळ चवीप्रमाणे.

कृती :  केळफूल निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावे. कुकरमध्ये 2-3 चिंच बुट्टके घालून केळफूल वाफवावे. भिजलेली चवळी कुकरमध्ये वेगळी वाफवावी. केळफुलातील पाणी काढून टाकावे. पातेल्यात फोडणी करून कांदा परतावा व लाल मिरची/ लाल तिखट घालावे. केळफूल व वाफवलेली चवळी घालून परतावे. चवीप्रमाणे धने-जिरे पूड, काळा मसाला, गूळ, मीठ, खोबरे, कोथिंबीर घालून परतावे. झाकण ठेवून 1 वाफ आणावी.

(साभार : साप्ताहिक सकाळ)

प्रतिक्रिया
On 6/12/2010 2:23 PM janu said:
खूप छान माहिती दिली .
On 3/2/2010 9:07 AM Aditi said:
Namaskar, kelfulachi khup chan mahiti milali,tasech tyachya receipee samjalya..khup khup dhanyawaad.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: