कॉल सेंटरच्या दोन व्यवस्थापकांना अटक
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 12:00 AM (IST)
वाशी - मूळ वेतनापेक्षा कमी पगार देणे, महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करून त्यांची पिळवणूक करणे, कामावर हजर असताना अनेकदा गैरहजेरी लावणे आदी प्रकारे कामगारांची तीन ते चार महिन्यांपासून पावणे एमआयडीसीतील एका कॉल सेंटरमध्ये पिळवणूक होत असे. याविरोधात कामगारांनी आज सकाळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन तुर्भे पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी कॉल सेंटरच्या दोन व्यवस्थापकांना अटक केली आहे.
एमआयडीसी येथील "आर टेक सिस्टीम' असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीत 350 ते 400 महिला-पुरुष काम करतात. या कंपनीतील काही अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केला जात असे. तसेच कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिने उशिराने पगार दिला जात असे, अशी महिला कामगारांची तक्रार आहे.
व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून महिला कर्मचाऱ्यांनी आज सकाळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी पावणे येथील आर. टेक कॉल सेंटरवर धडक दिली. अखेर व्यवस्थापनाने कामगारांना सर्व सुविधा देण्याचे कामगारांसमक्ष मान्य केले. कामगारांना अचानक कामावरून काढून टाकणे, गैरहजेरी लावणे, गैरहजर राहिल्यास एका दिवसाचे 700 रुपये कापून घेणे आदी प्रकार व्यवस्थापनाने केल्याची तक्रार कामगारांनी तुर्भे पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापक रविप्रसाद व अनिलकुमार या दोघांना आज अटक केली. दरम्यान, या दोघांना येथील काही कामगारांनीही मारहाण केली आहे.