Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शहरांची होताहेत गटारे; काय आहेत उपाय?
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 08:05 PM (IST)
Tags: pollution,   environment,   water,   cpcb,   mpcb
एकत्र या, जागृती करा आणि प्रशासनावर दबाव आणा
पुणे - 'एकत्र या, जनजागृती करा आणि प्रशासकीय यंत्रणांवर दबाब आणा,' अशा सूचना महाराष्ट्रातील सांडपाण्याच्या प्रश्‍नावर तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरीकांतून पुढे आल्या आहेत. महाराष्ट्रातील ८४ शहरे आणि निमशहरांमधील सांडपाण्याची आणि पर्यायाने ढासळत चाललेल्या तेथील पर्यावरणाची वस्तुस्थिती 'ई सकाळ'ने आठ फेब्रुवारीला मांडली होती. नागरीकरणात आणि पाणी पुरवठ्यात अव्वल असलेला महाराष्ट्र सांडपाणी निर्गतीच्या व्यवस्थेत कमालीचा मागे असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाआधारे 'ई सकाळ'ने दाखवून दिले होते.

या बातमीचा संदर्भ घेऊन पर्यावरण आणि जल व्यवस्थापनाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर म्हणाले, 'या प्रश्‍नावर सर्व तज्ज्ञांनी एकत्र येण्याची आणि नियोजन करून विकेंद्रीत सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभी करण्याची गरज आहे. मोठ्या शहरांत जे गृहनिर्माण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारतील त्यांनाच बांधकाम परवानगी दिली, तर सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नच उरणार नाही,'

काही वर्षांपूर्वी चेन्नईतील सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला होता, त्यावेळी तेथे पाणी प्रक्रिया मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली होती, याकडे श्री. देऊळगावकर यांनी लक्ष वेधले. 'घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचीही नोंद होण्याची गरज आहे. गरजेपेक्षा पाण्याचा जास्त वापर होत असल्यास त्यावर दंडही आकारला पाहिजे,' अशी सूचना त्यांनी केली.

'पुणे शहरात तयार होणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी १२ टक्के पाणी जमिनीत मुरते आणि जलस्त्रोतांवर प्रतिकूल परिणाम करते,' अशी माहिती देऊन पर्यावरण अभ्यासक विजय परांजपे यांनी, 'पुण्यातील सर्व सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यान्वित केले पाहिजेत', अशी मागणी केली. 'सांडपाणी निर्गत ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून, त्यासाठी नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे,' अशी सूचनाही त्यांनी केली.

सुधन्वा परांजपे यांनी जनजागृतीवर भर देतानाच अशा प्रकल्पांसाठी करप्रणालीही सुचवली आहे. शिवाय, या व्यवस्थेचे कोणत्याही स्थितीत खासगीकरण करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

नियोजनपूर्वक गटारे बांधण्यावर भर दिला पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाहून प्रभा शिंदे यांनी सुचविले आहे. जनजागृती हा प्रमुख उपाय असल्याचे त्यांचेही मत आहे. सांडपाणी निर्गतीची व्यवस्था लहान शहरांपर्यंत आणि खेड्यांपर्यंतही पोहोचवली पाहिजे, असे इस्राईलहून मोझेस जोसेफ अश्‍दोद यांनी सुचवले आहे.

नागरीकांनी सुचवलेले उपाय -
- लोकसंख्येचे स्थलांतर टाळणे. त्यासाठी स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था प्रकल्पांची संख्या वाढविणे.
- प्रत्येक औद्योगिक वसाहतीला सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था प्रकल्प अनिवार्य करणे.
- परदेशातील चांगल्या व्यवस्थांचा अभ्यास करून तशा महाराष्ट्रात उभ्या करणे.
- प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा शेतीसाठी किफायतशीर उपयोग करणे.
- पाणी पुरवठ्यातील गळती रोखणे, पाणी मीटर सक्तीचे करणे.

महाराष्ट्राच्या ढासळलेल्या सांडपाणी व्यवस्थेकडे सुजाण नागरीक म्हणून आपण फक्त पाहात बसायचे की काही मार्ग शोधायचे? विशेषतः तुम्ही परदेशात असाल तर तेथील व्यवस्थेशी कळत-नकळत संबंध आलेलाच असेल. नेमक्‍या काय चुका होताहेत आपल्याकडे आणि त्या कशा सुधारायच्या कशा, याची मनात कधीतरी उजळणी झालेली असेल.

आमच्यासोबत शेअर करा, तुमचा अनुभव. तुमच्या सूचना.
आमचा पत्ता webeditor@esakal.com (Subject मध्ये लिहा Pollution)

(या विषयावरील सविस्तर चर्चा इथे वाचा.)

प्रतिक्रिया
On 2/9/2010 9:05 PM RAVINDRA said:
MAAZA MATE NAGRIK TAR SUCHANA PALTIL JAR DAND VASUL HOEEL SOCIETY KADUN TYA SAATHI WARD MEMBER CHE SAHAKARYA GHAVE INDUSTRIAL WASTE FILTER KARAVE , PARDESI COMPANIS CONTRACT DYAVE WASTE PRODUCT RATRI 2AM TE 4 AM PARYANT SODAVE NADIT THODE DHARANANCHE PANI SODAVE RAIN WATER HARVESTING PMC KADHUN KARAVE NANTAR PAISE VASUL KARNE


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: