Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मागणी करा, काम मिळेल
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 01:06 AM (IST)
कापडणे - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या हमी रोजगारासाठी असलेल्या कामाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत असलेली कामे बंद पडली आहेत. मजुरांनी कामाची मागणी केल्यास ताबडतोब रोजगार उपलब्ध केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी आर. बी. निकुंभे यांनी येथे दिली.

येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच छायाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगवान माळी, विलास पाटील, मनोज पाटील, शिवाजी पाटील, संपर्क अधिकारी आर. झेड. निळे, कृषी विकास अधिकारी पी. एल. पाटील उपस्थित होते. येथील बिलाडी रस्ता, तारबल्ली रस्ता, मळकी रस्ता, नांद्रा फाटा रस्ता, सोनगीर रस्ता व इतर कामे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत मंजूर झालेली आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही कामे का सुरू झालेली नाहीत, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास अधिकारी म्हणाले, की या कामासाठी मजूर नाहीत. मजुरांकडून सध्या कोणत्याही कामाची मागणी नाही. मागणी झाल्याबरोबर त्वरित कामे सुरू केली जातील.
ग्रामस्थांनी रेशनकार्डसंबंधी विविध समस्या मांडल्या. रेशनकार्ड जीर्ण झाली आहेत. त्यांच्यावर पुरेसे रेशन मिळत नाही. नव्याने रेशन कार्ड मिळण्यास अडचणी आहेत. त्या सोडवाव्यात.

सरपंच पाटील यांनी कार्डधारकांनी लेखी तक्रारी देऊन मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

आरोग्यसेवक आर. सी. पाटील यांनी स्वाइन फ्लूबाबत माहिती दिली. तसेच कोरडा दिवस पाळ्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीने धुरळणी करावी. ग्रामस्थांनी घरात कोरडा दिवस पाळावा. लहान डबकी बुजावीत. तसेच पालाकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावेत, असेही ते म्हणाले.

कृषी विकास अधिकारी पी. एल. पाटील यांनी वनसंवर्धनाकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यावे. वृक्षे लावावीत. शेततळे करण्यासाठी कागदपत्रे देऊन पाठपुरावा करावा. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव अभियानात ग्रामस्थांनी सक्रिय व्हावे. आपापसांतील वाद मिटवावेत. पारंपरिक भांडणाची तडतोड करावी. गावातील एकही गुन्हा दाखल होत नाही. पूर्वापार चालत असलेल्या कोर्ट-कचेऱ्यांचा वाद आजही न्यायालयात चालू आहेत. त्यामुळे गाव पुरस्कारापासून दूर आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांनी सहकार्य करून शांतता राखण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष उज्ज्वल बोरसे यांनी केले. ग्रामसभेत निर्मलग्रामसाठी चर्चा करण्यात आली 85 टक्‍के निर्मलग्राम झाले आहे. केवळ पंधरा टक्‍के कुटुंबांनी स्वच्छतागृह बांधावीत, असे आवाहन संपर्क अधिकारी निळे यांनी केले.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: