Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

नांदेडमध्ये 64 लाखांची लूट
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: marathwada,   crime,   robbery,   nanded

नांदेड - जुना मोंढा भागातील व्ही. एन. सराफ दुकान फोडून चोरट्यांनी साडेतीन किलो सोने व काही मौल्यवान खड्यांसह तब्बल 64 लाख रुपयांचा ऐवज पळविला. सोमवारी (ता. आठ) सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे शेजारी असलेल्या बंद दुकानाला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफा दुकानात प्रवेश मिळविला होता.

नांदेडच्या पुरातन बालाजी मंदिराला लागून गुरुद्वारा बोर्डाचे श्री गुरुनानक मार्केट हे दोन मजली व्यावसायिक संकुल आहे. या संकुलात 18 व 19 क्रमांकाचे दुकान सुभाष सराफ यांनी 1994 पासून घेतलेले आहे. "व्ही. एन. ज्वेलर्स' नावाचे हे दुकान शहरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अकरा कामगार काम करतात. शनिवारी (ता. सहा) रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकानाचे कामकाज बंद झाले. या दुकानाच्या संरक्षणासाठी दर्शनी भागात दोन पाळ्यांत दोन वॉचमन काम करतात. दर रविवारी दुकानाला साप्ताहिक सुटी असते. या दुकानाला लागून लालवाणी यांचे "सन्मान फाईन क्‍लॉथ' हे दुकान आहे.

गेल्या पाच ते सात वर्षांपासून ते दुकान बंद आहे. त्यामुळे चोरांनी आधी लालवाणी यांच्या दुकानाची भिंत मागच्या बाजूने फोडली. त्यानंतर लागून असलेल्या सराफ यांच्या दुकानाची भिंतही फोडली. मौल्यवान दागिने लंपास केले. तीन किलो सहाशे ग्रॅम सोने पळविले आणि पाच लाख रुपये किमतीचे मौल्यवान खडे असा एकूण 64 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

सोमवारी (ता. आठ) सकाळी सराफ यांनी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक सत्यनारायण चौधरी, पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, सचिन पाटील आदींनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्‍वानपथकाला व ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते. 1994 मध्ये याच दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश काटकर, सहायक पोलिस निरीक्षक बेद्रे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे आणि वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

निजामाबादचे पोलिसही शहरात
नांदेड जिल्हा आंध्र प्रदेशच्या सरहद्दीवर आहे. निजामाबादजवळील मेदक येथेसुद्धा एका सराफा दुकानात नांदेडच्या घटनेप्रमाणेच चोरी झाली होती. तेथे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यामुळे निजामाबादच्या पोलिसांनी आज येथे येऊन नांदेडच्या चोरी प्रकरणाची माहिती घेतली.
 
सराफ असोसिएशनची आज पोलिस आयुक्तांशी चर्चा
पुंडलिकनगर येथील सराफ दुकानातून भरदिवसा लुटीच्या घटनेसंदर्भात "सराफ असोसिएशन'चे पदाधिकारी मंगळवारी (ता.नऊ) सकाळी साडेअकरा वाजता पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. दुकानांच्या सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना आणि सराफांवरील अन्यायाबाबत या वेळी चर्चा होईल, असे संघटनेचे अध्यक्ष दत्ता सावंत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

दरम्यान, पोलिस यंत्रणा आणि पोलिसांच्या तपासावर आपला पूर्ण विश्‍वास असून, आजपर्यंत झालेल्या सर्व घरफोड्या आणि दरोड्यांचा तपास वेगाने करून गुन्हेगारांना पकडले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: