Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पोलिसांचा धाकच नाही
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 01:04 AM (IST)
महेश मोरे - सकाळ वृत्तसेवा
जेल रोड - घरफोड्या, भुरट्या चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविणे, दुचाकींच्या चोऱ्या हे प्रकार नाशिक रोड भागात नित्याचेच झालेले आहेत. त्यातच आता दावणीला बांधलेल्या जनावरांपासून मंदिरांतील दानपेट्या व मूर्तींचीही चोरी होऊ लागल्याने या भागात तरी पोलिसांचा धाक आणि अस्तित्वही नावापुरतेच उरले आहे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

येथील दिगंबर जैन मंदिरातून काल (ता. 7) रात्री पंचधातूच्या मूर्तीसह दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अशाच पद्धतीने किमान दिवसाआड घरफोड्यांचे सत्र सुरू असून, त्यात आता घरासमोर बांधलेली जनावरेही पळविली जाऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नाशिक रोड जेल रोडसह अन्य भागांत गेल्या काही वर्षांपासून चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्याने चोरट्यांचा हा धुमाकूळ काही केल्या थांबायला तयार नाही. किमान दोन दिवसांआड घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने रोजची रात्र नागरिकांना भीतीच्या सावटाखालीच जगावी लागत आहे.

गेल्या सहा दिवसांत मोटवानी रोड भागात दोन घरफोड्या होऊन लाखोंचा ऐवज चोरीला गेला. तुलसीकिरण अपार्टमेंटमधील बाबूलाल सोमाजी पटेल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. जयभवानी रोड, आर्टिलरी सेंटर रोड, सायखेडा रोड अशा विविध मार्गांवर भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकारही नित्याचेच झाले आहेत.

एकीकडे सातत्याने सुरू असलेल्या घरफोड्या, दुसरीकडे भुरट्या चोरांचा उपद्रव, तर तिसरीकडे भररस्त्यात महिलांच्या सोनसाखळ्या लांबविण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने कायद्याच्या अस्तित्वाबाबतच शंका निर्माण होत आहे. विविध मंदिरांतील दानपेट्या लांबविणे हे प्रकारही आता वाढू लागले आहेत. उपनगर येथील झुलेलाल मंदिर, सायट्रिक येथील शनिमंदिर, ज्ञानेश्‍वरनगरातील विठ्ठल मंदिर आदी विविध भागांतील मंदिरांतील दानपेट्या लांबविण्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळे केवळ नागरिकच नव्हे, तर मंदिरातील देवही असुरक्षित झाले आहेत.

जनावरांचीही चोरी
गेल्या काही दिवसांत नाशिक रोड भागातून जनावरेही रात्रीतून गायब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. चार दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प येथून बारा म्हशी व एक गाय, तसेच पळसे येथूनही दोन बैल चोरीला गेले. जेल रोडच्या कॅनॉल रोड भागातही चोरांनी हा उपद्रव सुरू केला आहे. येथील इंदिरानगर भागातील अशोक एकनाथ चांदोडे यांच्या दारासमोर बांधलेली गाय तीन दिवसांपूर्वी रात्री अशीच चोरट्यांनी नेली. मात्र, चांदोडे नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार द्यावयास गेले असता त्यांना कित्येक तास ताटकळत ठेवले गेले.

जनावरे चोरी गेल्याच्या तक्रारी दाखल होतात. परंतु, नंतर पुढे तपासातून काय निष्पन्न होते, याविषयी कुणी काहीही सांगायला तयार नाही. बैल असो वा गाय, ही जनावरे नागरिकांच्या उपजीविकेची साधने असल्याने पोलिसांकडून ठोस तपास होणे आवश्‍यक आहे. मात्र, याबाबत साध्या तक्रारीही नोंदवून घेण्याबाबत पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

मद्यपींचाही धुमाकूळ
जेल रोड येथे मुख्य बाजारपेठ म्हणून प्रचलित असलेल्या छत्रपती चौकात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढली आहे. सायंकाळनंतर चौकात विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागत असल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते. मात्र, याच हातगाडी चालकांबरोबर दादागिरी करून त्याच ठिकाणी मद्याचे घोट रिझविणाऱ्या अनेक टोळक्‍यांची या भागात खुलेआम दादागिरी सुरू आहे. अनेकदा अगदी पोलिसांसमोरही या चौकात रात्री उशिरापर्यंत वादावादी व हाणामारीचे प्रसंग पाहायला मिळतात. सायखेडा रोड, ज्ञानेश्‍वरनगर ते चरणदास मार्केटपर्यंत या मद्यपींचा उपद्रव सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून खाद्यपदार्थ विक्रेते व बार मालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने या भागात डोळ्यासमोर गुन्हा घडूनही कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या गुन्हेगारीतून याच भागात दोन खून झाले आहेत. त्यात ड्यूटी बजावत असताना बिडवे या पोलिस कर्मचाऱ्याचीही हत्या झाली होती. या मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया
On 2/9/2010 6:05 PM aniket said:
सामान्य नागरिकांना त्रास द्यायला सांगा त्यांना बघा लगेच तयार..हप्ता खायला सांगा लगेच तयार...
On 2/9/2010 10:35 AM devdatta said:
पोलीस खाते हे राजकारणी गुंडांचे महसूल खाते आहे हो..... तुम्ही उगाचच त्यांच्याकडून चुकीच्या अपेक्षा करत आहात.... अति प्रगत महाराष्ट्रात राहून तुम्हाला साधे एवढे कळत नाही.... आपापला जीव आपल्यालाच वाचवायचा आहे... त्यांनी वाचवला तर त्याचे पैसे पडतात...


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: