भारत-पाक फाळणींच्या वेदना 'वेल्स'मध्ये उमटणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 05:21 PM (IST)
लंडन - भारताच्या 1947 मधील फाळणीच्या जखमा पंजाबच्या मनावर खोलवर रुजल्या आहेत. या जखमांना फुंकर घालण्याचे काम ब्रिटिश एशियन थिएटर करणार आहे. वेल्स येथे सुरू झालेल्या ग्वानवेन महोत्सवातून फाळणींच्या वेदना ब्रिटिशांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत. फाळणीच्या काळातील देशाची स्थिती, समाजजीवन आणि लोकांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिश एशियन थिएटर्सचे कलाकार नाटकाच्या माध्यमातून करणार आहेत. कलाकार मझार तिरमाझी, नामवंत तबलावादक कुलजीत भाम्रा हे 1940 च्या दशकातील भारतीय जीवनशैलीची गाथा सांगणार आहेत. उत्सवाचे समन्वयक फिलिप थॉमस म्हणाले, की या महोत्सवात फाळणीचे अनुभव कथन करण्यात येणार आहे.
जुन्या पिढीकडून फाळणीच्या घटना ऐकून भावी पिढी त्यातून शिकेल आणि याबाबींकडे सकारात्मक दृष्टिकोन समोर पाहून त्याचा नव्या पिढीला भविष्यात फायदा होईल. उत्सवात सादर होणाऱ्या नाटकांतून विविध समुदायांचे लोक एकत्र येऊन आपल्याला फाळणीच्या अनुभवात सामावून घेणार आहेत. कलादिग्दर्शक डॉमेनिक राय म्हणाले, की ब्रिटिशकालीन भारताच्या फाळणीची कथा आधुनिक वेल्सशी नाते जोडणारी ठरावी. वेल्सच्या आधुनिक आणि संमिश्र विचारसरणीत वाढलेल्या लोकांना भारावून टाकणारी ही कलाकृती असणार आहे.