Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

हकिमुल्ला मेहसूदचा मृत्यू झाल्याचा दावा
पीटीआय
Tuesday, February 09, 2010 AT 05:25 PM (IST)

इस्लामाबाद - "तेहरिके तालिबान पाकिस्तान' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हकिमुल्ला (वय 28) मेहसूद हा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे या संघटनेने आज मान्य केले. यापूर्वी या संघटनेने तो जिवंत असल्याचा दावा केला होता.

उत्तर वझिरिस्तान भागात 14 जानेवारी रोजी अमेरिकेकडून जोरदार हवाई हल्ले करण्यात आले. यात हकिमुल्ला गंभीर जखमी झाला होता. त्याला कराची येथे उपचारांसाठी नेले जात असताना मुलतान शहराजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा दावा या संघटनेतील सूत्रांनी एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना केला. हकिमुल्लाचा मृत्यू पंधरा दिवसांपूर्वीच झाला असून, औराकझाई येथे त्याला दफन करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

नूर जमाल ऊर्फ मौलाना तूफान हा आता "तेहरिके तालिबान पाकिस्तान'चा म्होरक्‍या असेल, असे संघटनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. संघटनेचे प्रवक्ते आझम तारीक यांनी मात्र हकिमुल्लाच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केलेली नाही. हकिमुल्ला जिवंत असून, तो अज्ञातस्थळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील खोस्ट प्रांतात तालिबानच्या हल्ल्यात अमेरिकी गुप्तचर यंत्रणा "सीआयए'चे सात अधिकारी मारले गेले होते. त्यानंतर हकिमुल्ला यास लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांत वाढ केली होती.

हकिमुल्लाची कारकीर्द
- दक्षिण वझिरिस्तानमधील कोटकाई गावात जन्म. मदरशांमधून शिक्षण.
- 9/11 हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधून तालिबान राजवट संपुष्टात आल्याने अमेरिकी सैन्याविरुद्ध लढा.
- करम, औराकझाई आणि खैबर या आदिवासी विभागात तालिबानचे नेतृत्व.
- या विभागातील अल्पसंख्य शीख समुदायावर जीझिया कर लादला.
- पेशावरमधील हॉटेल पर्ल कॉंटिनेंटल यांसह अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.
- बैतुल्ला मेहसूद हा मारला गेल्यानंतर "तेहरिके तालिबान पाकिस्तान'चा प्रमुख.



आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: