'ई-कॅपिटल'चा गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 01:03 AM (IST)
विटा - ई-कॅपीटल फंड जार्जिया, अमेरिका या इंटरनेटवरून मार्केटिंग करणाऱ्या कंपनीच्या दिलीप निवृत्ती पाटील या गुंतवणूक प्रतिनिधीने मोठ्या व्याजाला चटावलेल्या शेकडो लोकांना मासिक 25 टक्के व्याजाचे आमिष दाखवून कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. सध्या या कंपनीची वेबसाईट बंद झाली आहे. कंपनीचे प्रतिनिधीही मिळून येत नसल्याने गुंतवणूकदार जयंत पंढरीनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख कृष्णप्रकाश यांच्याकडे तक्रार केली आहे.
इंटरनेटवर ई-कॅपिटल फंड जार्जिया, अमेरिका या नावाने ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या कंपनीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यासाठी दिलीप निवृत्ती पाटील, रा. मांजर्डे (ता. तासगाव) यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण सांगली जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी लोकांना प्रेरित केले. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यास आठवड्याला 5 टक्के, महिन्याला 25 टक्के व वर्षाला 400 टक्के व्याज मिळेल, असे सांगण्यात आले. ही गुंतवणूक कमीत कमीत 5 हजार अमेरिकन डॉलर याप्रमाणात करायची होती. कंपनीकडून महिन्याला लाखाच्या गुंतवणुकीवर 25 हजार रुपये व्याज मिळणार असल्याने लोकांनी त्यामध्ये ऑक्टोबर 2008 पासून गुंतवणूक करण्यास सुरवात केली.
गुंतवणुकीनंतर काही गुंतवणूकदारांना सांगितल्याप्रमाणे व्याजही देण्यात आले. परंतु, मे 2009 पासून तीन महिने पैसे येणे बंद झाले व त्यानंतर तीन महिन्यांने इंटरनेटवरून ही वेबसाईट गायब झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. प्रतिनिधी दिलीप पाटील यांनी गुंतवणूकदारांना व्याजाच्या रकमेची हमी दिली होती. त्यानुसार काही लोकांना पैसे दिले व काही लोकांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. या कालावधीत कंपनीने पाठविलेली रक्कम पाटील यांनी परस्पर काढून घेतल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना मांजर्डे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र, येथील विटा मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बॅंक यांचे धनादेश दिले होते; परंतु ते न वटल्याने त्याच्या मागे गुंतवणूकदारांनी तगादा लावला. त्यानंतर तो बेपत्ता झाला आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंका, शेअरबाजार, पोस्ट, विमा यामधील गुंतवणुकीपेक्षा जादा रक्कम मिळत असल्याने बऱ्याच लोकांनी लाखापासून 10 लाखांपर्यंत शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे व त्याचा प्रतिनिधी मिळून येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे.
शहाणपण केव्हा?
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सांगली, इस्लामपूर, मिरज, शिराळा येथे साखळी योजनांच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याची प्रकरणे चव्हाट्यावर आली. विट्यात तर यापूर्वी चार ते पाच प्रकरणे झाली आहेत. तरीही यातून लोकांनी शहाणपण घेतले नाही. बॅंकांना वर्षाला दहा टक्क्यांपर्यंत व्याज देणे जिथे परवडत नाही, तिथे अशा कोणताही पूर्वेतिहास माहीत नसलेल्या कंपन्यांच्या तीनशे अन् चारशे टक्के व्याजाच्या आमिषाला लोक बळी पडतातच कसे, हा प्रश्न आहे.