महावितरणचा 434 कोटी रुपयांचा आराखडा
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 01:01 AM (IST)
सोलापूर - जिल्ह्यातील विज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांचा 434 कोटी 69 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळून ती कामेही सुरु झाली आहेत. येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती अधिक्षक अभियंता जयंत सोनवणे यांनी "सकाळ'ला दिली.
विज वितरणातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय विकास आराखडे मंजूर केले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यासाठी 434 कोटी 69 लाख रुपये मंजूर झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच हा आराखडा मंजूर झाला, आता कामांनाही सुरुवात झाली आहे. याबाबत आधिक माहिती श्री. सोनवणे व अधिकारी श्री. थोरात यांनी दिली.
या आराखड्यानुसार कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील विज वितरणाचे नेटवर्क वाढणार आहे. कमी दाबाने (लो-व्होल्टेज) वीज पुरवठ्याची समस्या कमी होणार आहे. त्यासाठीच्या कामांना मंजुरी देवून ती सुरुही करण्यात आलेली आहेत. 434 कोटीच्या आराखड्यात 38 उपकेंद्रांची क्षमता वाढविली जात आहे. 24 उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त ट्रान्स्फार्मर बसविले जाणार आहेत. पाच हजार 284 वितरण रोहित्रे बसविली जातील. 33 केव्ही उपकेंद्रावरुन 507 किलोमीटरची वाहिणी टाकली जाईल तर 11 केव्ही उपकेंद्रावरुन दोन हजार 938 किलोमीटरची वाहिणी टाकली जाणार आहे. हा आराखडा तालुकानिहाय करण्यात आला आहे. त्यानुसार कामे सुरु आहेत.