'लिव्हरपूल'च्या खरेदीसाठी मुकेश अंबानींची बोली?
पीटीआय
Tuesday, February 09, 2010 AT 05:18 PM (IST)
लंडन - क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अटकेपार झेंडा लावल्याच्या अनेक घटना आहेत. पण, एखाद्या भारतीय व्यावसायिकाने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकल्याचे उदाहरण दिसून येत नाही. मात्र, सध्या इंग्लिश फुटबॉलमध्ये सर्वाधिक यशस्वी असणारा लिव्हरपूल फुटबॉल क्लब सध्या विकायला काढला जात असल्याची चर्चा आहे आणि तो खरेदी करण्यासाठी भारतातील रिलायन्स उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष मुकेश अंबानी आणि सहारा उद्योग समूहाचे सुब्रतो रॉय यांच्याकडून बोली लावली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लिव्हरपूल क्लबची मालकी सध्या अमेरिकेच्या जॉर्ज जिलेट आणि टॉम हिक्स यांची असून, त्यांनी 2007 मध्ये हा क्लब खरेदी केला होता. मात्र, काही कारणाने या दोघांमधील करार मध्येच मोडण्याचा निर्णय झाल्याने आणि फुटबॉल शौकिनांकडूनही फारसा पाठिंबा मिळत नसल्याने हा क्लब नव्याने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय खरेदीदारांमध्ये "दुबई इंटरनॅशनल कॅपिटल' या उद्योग समूहासही या क्लबमध्ये रुची असल्याचे समजते.