पुणे - ''गेल्या एक हजार वर्षांमध्ये संशोधनात भारताने फारसे योगदान दिले नाही. हा इतिहास पुसून भविष्यात नवीन इतिहास घडवावा. त्याची नोंद जग घेईल,'' असा विश्वास 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

शस्त्रक्रियेचा चित्तवेधक इतिहास सांगणाऱ्या 'कहाणी शस्त्रक्रियेची' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. विजय बापये यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे आणि "रोहन प्रकाशन'चे प्रदीप चंपानेरकर व्यासपीठावर उपस्थित होते. "रोहन प्रकाशन'तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
पवार म्हणाले, ''देशातील संशोधन ढेपाळले आहे. गेल्या एक हजार वर्षांमध्ये संशोधनात युरोप आघाडीवर आहे. भारत यात मागे राहिला आहे. पुढील एक हजार वर्षांमध्ये भारताने संशोधनात भरीव योगदान करावे. त्यामुळे हा इतिहास पुसून नवा इतिहास लिहिला जाईल. त्याची नोंद जगाला घ्यावी लागेल, अशी अपेक्षा आहे.''
''कुठल्याही भाषेतील माणसाला हे पुस्तक उपयुक्त आहे. हे पुस्तक इतर भाषांमध्ये भाषांतरित झाले पाहिजे,'' असेही ते म्हणाले.
डुम्बरे म्हणाले, ''माहितीचा निर्जीवपणा या पुस्तकात नाही. ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होण्याची प्रक्रिया यातून स्पष्ट होते.'' शस्त्रक्रियेच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या या पुस्तकात भारतीय नावे अपवादानेच आढळतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. बापये म्हणाले, ''शस्त्रक्रिया हा माझा प्राण आहे. पण शस्त्रक्रियेच्या इतिहासाची माहिती देणारे पुस्तक मराठीमध्ये नव्हते. त्यामुळे हे पुस्तकाच्या लेखनाचा निश्चय केला.''
चंपानेरकर म्हणाले, ''आधुनिक काळात शस्त्रक्रियेचे तंत्र प्रगत झाले आहे. त्यामुळे रुग्णांचा त्रास कमी झाला आहे. मध्ययुगापासून या शस्त्रक्रियांचा विकास कसा झाला, हे या पुस्तकात मांडले आहे.''
'क्रॉसवर्ड'चे गिरिधर अगरवाल यांनी स्वागत केले. रोहन चंपानेरकर यांनी आभार मानले.