ज्ञानेश्वरी समकालीन ग्रंथ - कुलकर्णी
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 22, 2010 AT 12:15 AM (IST)
पुणे - ''तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरी हा केवळ यादवकालीन नव्हे तर समकालीन ग्रंथ आहे,'' असे मत साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले.
'सिग्नेट पब्लिकेशन्स'तर्फे (कै.) सुमन देवलिखित "आपण सारे पार्थ' या ज्ञानेश्वरीवरील निरूपण ग्रंथाचे प्रकाशन डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, प्रा. अविनाश आवलगावकर, देव यांची कन्या अंजली महागावकर आणि प्रकाशक प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ''ज्ञानेश्वरी हा ज्ञान, कर्म आणि भक्तियोगाचा प्रात्यक्षिक आविष्कार आहे. ज्ञानेश्वरीतून अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले असेल तर श्रीकृष्ण-पार्थ, गीता-ज्ञानेश्वरी, गुरू-शिष्य आणि वक्ता-श्रोता हे द्वैत का मांडले आहे? अमृतानुभवाचे प्रत्यंतर देणारी ज्ञानेश्वरी हे शिव-शक्तीचे स्वरूप असल्याने द्वैतातून अद्वैताकडे जाण्याची प्रक्रिया आपल्याला कळते. यवनी, इंग्रजांच्या आक्रमणानंतरही मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती नष्ट होऊ शकली नाही, त्यामुळे आता ती जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत नाहीशी होईल ही भीती व्यर्थ आहे.''
देखणे म्हणाले, ""जगाच्या सर्व साहित्यातील सगळे दृष्टांत ज्ञानेश्वरीत सामावले आहेत. भगवद्गीता हे ज्ञानदर्शन असले तर ज्ञानेश्वरी हे भावदर्शन आहे. "आपण सारे पार्थ' हे निरुपणाच्या अंगाने ओवलेले पुस्तक आहे.''
आवलगावकर म्हणाले, ""मराठीमध्ये टीकाग्रंथाची परंपरा ज्ञानेश्वरीपासून आलेली आहे. "एक तरी ओवी अनुभवावी' या जाणिवेतून ज्ञानेश्वरीवर आणखी टीकाग्रंथ निर्माण होतील. संतसाहित्याकडे निखळ जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणून पाहावे लागेल. या वेळी महागावकर यांनी मनोगत व्यक्त केले. आडकर यांनी प्रास्ताविक केले. वैशाली वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निळकंठ देव यांनी आभार मानले.