जीवनाच्या वाटेतील अडथळे धैर्याने पार केल्यास प्रगती
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 28, 2010 AT 12:36 AM (IST)
पुणे - ''जीवनाच्या वाटेत आलेली अडथळ्यांची शर्यत धैर्याने पार केल्यास प्रगती साधता येते,'' असे मत "सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांनी शनिवारी व्यक्त केले.
एकनाथ वाणीलिखित "मी, पृथ्वी आणि प्रवास' पुस्तकाचे प्रकाशन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. प. मंगुडकर, डॉ. प्रमोद तलगेरी, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, मंजिरी जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
पाध्ये म्हणाले, ""परिस्थिती हाताळत वाटचाल केल्यास शोधण्याची प्रवृत्ती निर्माण होते. कष्ट व प्रामाणिकपणाच्या बळावर चांगले यश मिळते. अशाप्रकारे काम करणारे समाजातील आदर्श असतात. वाणी यांचे कार्यही समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या लेखनात सूचक आणि स्पष्टपणा आहे. त्यामुळे त्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे.''
डॉ. निगवेकर म्हणाले, ""जीवघेण्या स्पर्धांमुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना एकनाथ वाणी यांचे "मी, पृथ्वी आणि प्रवास' हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसे पाहावे, याचा वस्तुपाठ या पुस्तकात मांडला आहे. सामाजिक संतुलन व समृद्ध जीवनाचा संदेश या पुस्तकात आहे.''
डॉ. तलगेरी म्हणाले, ""वाणी यांचे पुस्तक सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, त्यात जीवन व भौगोलिक प्रवास मांडला आहे.'' डॉ. मंगुडकर, डॉ. देसाई, जोशी व वाणी यांचीही या वेळी भाषणे झाली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.