पुणे - 'प्रकटली श्री ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ नव्या पिढीसाठी सोप्या मराठीतील ज्ञानाचा साक्षात्कार आहे, असे प्रतिपादन "सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांनी शनिवारी येथे केले.
स्वामी उमानंद सरस्वती सिद्ध योग आश्रम ट्रस्टतर्फे स्वामी राधिका आनंद यांनी लिहिलेल्या "प्रकटली श्री ज्ञानेश्वरी' या नव्या स्वरूपातील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कर्वेनगरमधील प्रतिज्ञा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पाध्ये बोलत होते.

स्वामी राधिका आनंद या सेतू माधवराव पगडी यांच्या घराण्याच्या परंपरेतील वारसा चालवीत असल्याने त्यांनी ग्रंथात केलेले वर्णन सुबोध, सोप्या भाषेतील असून रसाळ भावार्थ ओथंबून वाहात आहे. त्यामुळे एकतरी ओवी अनुभवावी या उक्तीचे प्रत्यंतर येत असल्याचे पाध्ये यांनी सांगितले.
ते म्हणाले, ""वाढलेला भ्रष्टाचार, गळेकापू स्पर्धा यामुळे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीतील विचार कोमात गेल्यासारखी स्थिती असताना प्रकाशित झालेल्या या ग्रंथामुळे नवीन दिशा देणारा प्रकाशकिरण निर्माण होईल.''
स्वामी राधिका आनंद यांनी या वेळी "प्रकटली श्री ज्ञानेश्वरी' लिहिताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. त्या म्हणाल्या, ""मराठीतील या ग्रंथासाठी अनेक संतांच्या विचारांचे मला मार्गदर्शन लाभले. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. कलियुगातील अंधार दूर करून सत्युगाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्वरीतील विचार उपयुक्त असून बुद्धीला चालना देणारे आहेत.''
नागपूर येथील ऍड. किशोर कांत, श्री. गोवारीकर, डॉ. शुक्ला आदींची या वेळी भाषणे झाली. अमिता मुळे आणि कांचन कांडगे यांनी सूत्रसंचालन केले.