Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

प्रवीण महाजनचे पुस्तक 'आऊट ऑफ प्रिंट'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 10, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: pravin mahajan,   book,   mumbai

शर्मिला कलगुटकर - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - आपल्यासोबत असंख्य अनुत्तरित प्रश्‍नांची शृंखला घेऊन गेलेल्या प्रवीण महाजनने प्रमोद महाजन यांची हत्या का केली, याची उकल अलिकडच्या काळात होणार नाही. कौटुंबिक कलह, वैमनस्य, मत्सर, पराकोटीचे नैराश्‍य की अजून कोणत्या कारणामुळे प्रवीणकडून हे पातक घडले, याबाबत आजही अनेकांना उत्सुकता आहे. याच कुतूहलासाठी प्रवीणने तुरुंगात लिहिलेल्या "माझा अल्बम' या पुस्तकांची मागणी वाढती असली तरीही सध्या हे पुस्तक "आऊट ऑफ प्रिंट' झाले आहे.

प्रवीणचे हे पुस्तक म्हणजे त्याचे आत्मचरित्र आहे, असा समज होता; मात्र पुस्तकात त्याने, हे आत्मचरित्र नाही, कैफियत नाही किंवा कोणाचीही सहानुभूती मिळवण्याचा हेतू ठेवून लिहिलेली चित्तरकथा नसल्याचे सांगितले आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाच्या जुन्या आठवणींच्या छायाचित्रांचा अल्बम एखाद्यास दाखवतो, त्याचप्रमाणे अंबाजोगाईतल्या दिवसांमधल्या बालपणापासून प्रमोद महाजन यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या बहरीच्या काळापर्यंतचे अनेक तपशील, आरोप-प्रत्यारोप प्रवीणने "माझा अल्बम'मधून केले आहेत.
 
पुस्तकाची प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा झाली होती. त्यादरम्यान त्याचा खपही जोरदार झाला. नंतरच्या काळात तो थंडावला; मात्र आता प्रवीणच्या निधनानंतर पुन्हा वाचक पुस्तकाची मागणी करू लागल्याचे "आयडिअल'चे मंदार नेरूरकर सांगतात. त्याची दुसरी आवृत्तीही आता संपली असून प्रकाशकांकडे नव्या आवृत्तीसाठी मागणी केली असली, तरीही त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. "माझा अल्बम' हे मराठीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ते इंग्रजीमध्येही अनुवादित केले जाणार होते. त्याची खातरजमा करण्यासाठी वाचक फोर्टमधील "स्ट्रॅन्ड' बुक स्टॉलकडे वळत आहेत.

हे पुस्तक म्हणजे राजकीय "स्टंट' असल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला असला, तरीही त्यात दुसरी बाजूही असल्याचा ठाम विश्‍वास प्रवीणच्या एका जवळच्या व्यक्तीने व्यक्त केला आहे. हे पुस्तक म्हणजे राजकीय "स्टंट' असल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला असला, तरीही आता हाच अक्षररूपातील हाच दस्तावेज त्याच्या जवळच्या माणसांची सोबत करणार आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच, या अल्बममधील अनेक चित्रे काळीकुट्ट असली, तरीही त्यात प्रवीणच्या दबलेल्या अनेक व्यथा आहेत, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: