'सकाळ'ऐवजी पुढारी नकोच; वाचकांनी अंक नाकारले!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 11, 2010 AT 09:41 AM (IST)
कोल्हापूर - नियमित 'सकाळ' वाचणाऱ्यांच्या घरात आज काही विक्रेत्यांनी "सकाळ'ऐवजी पुढारी टाकल्यानंतर वाचकांच्या तीव्र प्रतिक्रियेस विक्रेत्यांना सामोरे जावे लागले. 'सकाळ'ऐवजी पुढारी टाकल्यास बिल देणार नाही इथंपासून ते पुढारी परत घेऊन जा, असा दम वाचकांनी भरला आणि अनेकांनी पुढारी परतही दिला.
आज नेहमीप्रमाणे "सकाळ'च्या प्रतीक्षेत असलेल्या वाचकांना एजंट व विक्रेत्यांनी कमिशनसाठी "सकाळ'वर बहिष्कार घातल्याचे वृत्त थोडे उशिरा समजले. मात्र; त्यानंतर सकाळ शहर कार्यालय, एमआयडीसी कार्यालय, बातमीदार, जाहिरात, वितरणचे प्रतिनिधी यांचे फोन खणखणू लागले व वाचक अंक का आला नाही, याबरोबरच अंक कुठे मिळेल, याची चौकशी करू लागले.
"सकाळ'ऐवजी पुढारी टाकला तरी चालतो, या भ्रमात असलेल्या अंक विक्रेत्यांना आज सकाळी वाचकांच्या ठाम भूमिकेमुळे काही क्षण उत्तर देणे अवघड झाले. कमिशनचा वाद विक्रेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केल्यावर तुमच्या कमिशनचे आम्हाला काही सांगू नका. "सकाळ'च आम्हाला हवा. दुसरा कोणताही अंक आम्हाला चालणार नाही, असे सांगितल्याने काही विक्रेत्यांनी गुपचूप "सकाळ'चा अंक नेण्याचा प्रयत्नही केला.
आज "सकाळ' न मिळाल्याची प्रतिक्रिया धान्य व्यापारी संजय हुक्केरी यांनी नेमक्या शब्दांत व्यक्त केली. ते म्हणाले, "गेली २८ वर्षे आम्ही "सकाळ' वाचतो. "सकाळ' आमच्या कुटुंबाचा एक घटकच बनला आहे. सर्वसमावेशक असलेल्या "सकाळ'ऐवजी दुसरे भडक वृत्तपत्र वाचण्याची कल्पनाच सहन होऊ शकत नाही.''
ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सरदेसाई यांनी भाऊसिंगजी रोडवरील आपल्या स्टॉलवर आज "सकाळ' ठळकपणे मांडला. त्यांनी "सकाळ' विकू नये म्हणून वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला; पण मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा सदस्य नाही आणि कोणते वृत्तपत्र मी विकावे व कोणते विकू नये, हे सांगण्याचा हक्क कोणालाही नसल्याचे त्यांनी सांगितले. एरवी त्यांच्या स्टॉलवरून "सकाळ'चा १०० अंक खपतो; पण आज ४१६ अंकांची त्यांनी विक्री केली.
मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मुस्लिम बोर्डिंगचे अधीक्षक कादर मलबारी यांनी वाचकाला "सकाळ' पाहिजे असेल तर विक्रेत्यांनी त्याऐवजी दुसरे वृत्तपत्र टाकण्यास विरोध दर्शविला. ते म्हणाले, "सकाळ'चा निर्भीडपणा, निःपक्षपातीपणा आम्हाला आवडतो. म्हणून तो आम्ही घेतो. विक्रेत्यांना दुसरे वृत्तपत्र टाकण्याचा अधिकार नाही.''
मंगळवार पेठेतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजू भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी "सकाळ'वर विक्रेत्यांचा बहिष्कार चालू राहिल्यास स्वतः अंक विक्रीच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. ते म्हणाले, "शाहू बॅंक, नंगीवली तालीम ते पाण्याचा खजिना परिसरात अंक विक्रीसाठी सर्व सहकार्य केले जाईल. वाचकांना जो आवडतो तोच अंक विक्रेत्यांनी दिला पाहिजे व ते देत नसतील तर स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे.''
रंकाळा रोड महादेव मंदिर परिसरातील कार्यकर्ते शिरीष ऊर्फ भैया कदम यांनी अंक विक्रीसाठी स्वतः रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शविली. ते म्हणाले, ""महिन्यापूर्वी विक्रेत्यांनी अशाच स्वरूपाचा बहिष्कार घातला होता. त्यावेळीही आम्ही सहकार्याचा हात पुढे केला. कारण "सकाळ' सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या हाकेला तत्काळ साद घालतो. मग अशाच अडचणीच्या काळात आम्ही "सकाळ'च्या मागे का उभे राहू नये?''
शिवाजी पेठेतील कार्यकर्ते रमेश वणिरे यांनी "सकाळ'शिवाय अन्य दैनिक आमच्या कुटुंबात आम्ही मान्यच करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ""आम्हाला "सकाळ' हवा आहे आणि त्या जागी पुढारी टाकण्याचा विक्रेत्यांना काय अधिकार आहे. भले तुमचा संप मिटेपर्यंत कोणताही अंक टाकू नका; पण पुढारी किंवा अन्य दैनिक पर्याय म्हणून आम्ही स्वीकारणार नाही.''
मोहिते मळा परिसरातील (देवकर पाणंद) बजरंग देवकर म्हणाले, "आज आमच्या घरी "सकाळ'ऐवजी पुढारी टाकल्यानंतर विक्रेत्यांशी आम्ही भांडणच काढले. आम्हाला "सकाळ' हवा असताना पुढारी टाकल्यास बिल देणार नाही, असा दम भरला. आम्ही आज "सकाळ'ऐवजी पुढारी स्वीकारला नाही.''
साकोली कॉर्नर येथील सुरेश पाटील म्हणाले, " "सकाळ'व्यतिरिक्त अन्य कोणताही अंक वाचण्याची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आज विक्रेत्याकडून दुसरा अंक स्वीकारला नाही व पुढे स्वीकारणारही नाही.''
सराफ व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष बाबा महाडिक म्हणाले, "कमिशनच्या वादाचा आणि वाचकांचा काही संबंध नाही. वाचकाला जे वृत्तपत्र हवे आहे तेच विक्रेत्यांनी दिले पाहिजे. वाचकाला जे वृत्तपत्र आवडते तो ते घेईल. विक्रेत्यांनी सक्तीने अन्य अंक देऊ नये.''
शाहू मिल चौक परिसरातील फिरोज मुजावर यांनीही आम्ही केवळ "सकाळ'चे वाचक आहोत. गेली दहा वर्षे फक्त "सकाळ'च वाचतो. त्यामुळे एजंटांनी जरी दुसरा कोणता अंक टाकला तर आम्ही परत केला. आम्ही केवळ "सकाळ'चेच वाचक आहोत. आज एजंटाने अंक दिला नाही, तरीही आम्ही "सकाळ'च्या वतीने फिरणाऱ्या रिक्षातून "सकाळ' विकत घेतला, असे सांगितले.
महाडिक कॉलनी येथील सौ. स्वाती कुलकर्णी यांनी आज "सकाळ'ऐवजी पुढारीचा अंकच स्वीकारला नाही. त्या म्हणाल्या, ""विक्रेत्यांच्या मतानुसार नव्हे आमच्या मनानुसारच आम्ही वृत्तपत्र घेतो.''
रविवार पेठेतील रहिवासी आणि धान्य व्यापारी श्रीनिवास मिठारी यांनीही आम्ही "सकाळ'चेच वाचक असल्याचे सांगितले. आज घरी "सकाळ' न मिळाल्यामुळे शिवाजी चौकात थांबलेल्या रिक्षातून तो घेऊन आलो. सत्य माहिती आणि जनतेचे प्रश्न मांडणारा "सकाळ'च आमचे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे "सकाळ'शिवाय दुसरा अंक आम्ही खपवून घेणार नाही.''
जे वृत्तपत्र समाजहिताविरोधी धोरण राबविते, त्या वृत्तपत्रावर वाचकांनीच बहिष्कार टाकण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र यादव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ""जेव्हा वाचकच अशी भूमिका घेतील, तेव्हाच हे भडकवृत्तपत्र ताळ्यावर येईल. त्यामुळे वाचकांनी आता या क्षणी ठाम राहाण्याची गरज आहे.''
दबाव टाकण्याचे दिवस संपले - देसाई
नगरसेवक नीलेश देसाई - धनदांडग्यांच्या दबावाला बळी पडून विक्रेत्यांनी बहिष्कार टाकणे योग्य नाही. एक रुपयात लोकांचा फायदा होत असेल तर विक्रेत्यांनी दोन पावले मागे घेऊन "सकाळ'ला साथ द्यावी. लोकांना जे वृत्तपत्र वाचनीय वाटते, तेच लोक घेतात. लोकांवर दबाव टाकून कुणी अंक विकत घेत नाही. स्वाभिमान सगळेच गहाण टाकत नसतात. दबावाला बळी पडून माघार घेण्याचे दिवस आता संपले.