Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

विदर्भात तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 11, 2010 AT 12:45 AM (IST)
तरोडा/ खरांगणा (जि. वर्धा) यवतमाळ - बारावीच्या विद्यार्थिनीची कॉपी पकडल्याने वर्धा जिल्ह्यात; तर यवतमाळ जिल्ह्यात डी.टी.एड. व नवव्या वर्गातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना आज (ता. 10) उघडकीस आली.

बारावीच्या परीक्षेत कॉपी पकडल्याने निलंबित झालेल्या दाणापूर (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील प्रज्ञा बाबाराव कांबळे (वय 18) या विद्यार्थिनीने मंगळवारी (ता. नऊ) सायंकाळी सातच्या सुमारात गावाबाहेरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

प्रज्ञा कांबळे हिला पिंपळखुटा येथील बारावीच्या परीक्षाकेंद्रात मंगळवारी अर्थशास्त्र विषयाच्या पेपरला कॉपी करताना पकडल्याने निलंबित करण्यात आले होते. या केंद्रातून 17 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले, त्यात प्रज्ञाचा समावेश होता. निलंबनाची कारवाई ऐकल्यानंतर ती दाणापूर येथील घरी गेली. घरी थोडावेळ थांबून ती थेट गावाबाहेरील विहिरीवर गेली आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

प्रज्ञा कांबळे ही पिंपळखुटा येथील डॉ. कराळे विद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती दाणापूर येथून पिंपळखुटा येथे सात किलोमीटर अंतर सायकलने यायची.

प्रज्ञा हुशार होती. पण, विद्यालयात कॉपीचा सुळसुळाट असल्याने कोणीतरी फेकलेल्या कॉपीचे बालंट तिच्यावर आले; ते प्रज्ञाला सहन झाले नाही आणि तिने आत्महत्या केली, असे प्रज्ञाचे काका वसंतराव कांबळे यांनी सांगितले.

अन्य घटनेत, यवतमाळ येथे वसतिगृहात गृहपाल आणि इतरांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून डी.टी.एड. प्रथम वर्षाला शिकणाऱ्या प्रतिभा गुणवंतराव मडावी (वय 18, रा. सावळा, ता. धामणगाव, जि. अमरावती) या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सावळा येथे आज (ता. 10) सकाळी नऊच्या सुमारास घडली. प्रकरणी प्रतिभाच्या वडिलांनी धामणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.

यवतमाळ येथील गोधनी मार्गावर असलेल्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणारी प्रतिभा ही शासकीय अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. सोमवारी (ता. आठ) ती वसतिगृहातून अचानक निघून गेली. ती घरी पोचली नसल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान मंगळवारी (ता. नऊ) दुपारी सावळा ते आसेगाव या गावांदरम्यान असलेल्या एका विहिरीजवळ तिचे दप्तर आणि चप्पल आढळून आली. त्या ठिकाणी विहिरीत शोध घेणे सुरू केल्यानंतर बुधवारी (ता.10) सकाळी 9 च्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. यावेळी तिच्या दप्तराची झडती घेतली असता त्यात आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीच्या आधारे प्रतिभाचे वडील गुणवंत मडावी यांनी धामणगाव पोलिस ठाण्यात आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती एस. एन. खडसे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जी. पी. गरड, पांढरकवडा प्रकल्प अधिकारी सारंग कोडलकर, सहायक प्रकल्प अधिकारी टापरे यांच्यासह आदिवासी नेते किरण कुमरे यांनी वसतिगृहाला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान वसतिगृहाच्या गृहपाल खडसे उपस्थित नव्हत्या. प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अप्पर आयुक्त यांनी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींना विचारले असता प्रतिभा ही वसतिगृहात एकटीच राहायची आणि याआधीसुद्धा ती दोनवेळा न सांगता वसतिगृहातून घरी निघून गेली असल्याचे त्यांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी कुणावरही गुन्हा नोंद झालेला नव्हता.

वसतिगृहात प्रतिभाला होणाऱ्या त्रासाबद्दल तिने एका डायरीत संपूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे. त्यातील काही पानांच्या फोटोकॉपीज तिच्या बहिणीकडे दिल्यात; मात्र ती डायरी गृहपालांनी जप्त करून ठेवली आहे, असे प्रतिभाच्या बहिणीने सांगितले.

तिसऱ्या घटनेत, अकोलाबाजार (जि. यवतमाळ) येथून जवळच असलेल्या सालोड येथील वर्षा भीमराव हनुमंते (वय 16) या नववीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. वर्षा अकोलाबाजार येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकत होती. सकाळी दहाला घरी आल्यानंतर शेतातील कडूनिंबाच्या झाडाला तिने गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
प्रतिक्रिया
On 3/11/2010 11:39 AM prof mrs alkaa N Rane said:
मला वाटत प्रतेकानी स्वताचा मानसिक तोल ढळू नाही दिला पाहिजे. ह्याकरता पालकांनी आपल्या मुलांशी जास्तीत जास्त स्ववाद वाढवला पाहिजे.आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चालाय हे आवर्जून पहिला पाहिजे.
On 3/11/2010 10:50 AM एक मराठी said:
@ तुषार कुटे, मी कोणाचाही अपमान करीत नाही. जे सत्य आहे ते सांगत आहे. तुमच्या सारख्या मराठी लोकांना चांगल्या नोकऱ्या भेटल्या याचा अर्थ असा नाही की सर्व मराठी लोकांना नोकऱ्या भेटल्या.
On 3/11/2010 10:05 AM Tushar Kute said:
हा 'एक मराठी' मराठी माणसांचा अपमान करतो आहे. मराठी माणसानी आपला प्रामाणिकपणा सोडू नये.
On 3/11/2010 8:52 AM एक मराठी said:
का कॉपी करू नयेत या मुलांनी? आज जरी प्रामाणिकपणे अभ्यास करून पास झाले तरी पुढे नोकरी कुठे भेटणार आहे? यु पी, बिहारची मुले तिकडे कॉपी करून पास होतात व नोकरी साठी इथे येतात. त्यांना बरोबर नोकऱ्या भेटतात. पणे इथे प्रामाणिक पणे अभ्यास करून नोकऱ्या भेटत नाहीत.
On 3/11/2010 5:43 AM Pravin Deshpande said:
काय यार, सुटल्या का सगळ्या अडचणी??
On 3/11/2010 3:34 AM reader said:
काय लिहावे तेच समजत नाही.. वाढत्या लोक्संखेमुळे आणि स्पर्धेमुळे मुलांच्या वर फार ताण पडत आहे .. आई - वडिलांनी मुलांना समजून घेवून त्यांच्या वर लक्ष ठेवायला पाहिजे.. त्यामुळे अशा घटना कमी होतील..


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: