Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

स्वप्नीलची तान ऐकून नागपूरकर विसरले भान
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 11, 2010 AT 12:30 AM (IST)

नागपूर - बेधुंद करणारी एकापेक्षा एक गीते सादर होत असतानाच सर्वच रसिकांचे कान 'ते' गीत ऐकण्यासाठी आसुसले होते. अखेर, स्वप्नीलने आपल्या खास शैलीत 'राधा ही बावरी'चा सूर आळवला अन्‌ नागपूरकर भान विसरले. जुनी व नवीन मराठी-हिंदी गीते, कव्वाली, लावणी असा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात होता. अनेक गीतांवर शिट्ट्या व टाळ्यांचा पाऊस पडला. रसिक देहभान विसरून नाचले. हा चमत्कार आज रसिकांनी खचाखच भरलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात अनुभवायला मिळाला.

'सकाळ'च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'राधा ही बावरी' या मराठी-हिंदी गाण्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे नागपूरकरांची आजची सायंकाळ संस्मरणीय ठरली. जान्हवी अरोरा हिची गायकी आणि जितेंद्र जोशीच्या खुमासदार निवेदनानेही वेगळीच रंगत या कार्यक्रमाला आणली. स्वप्नीलने रंगमंचाचा ताबा घेताच रसिकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला. सुरुवातीलाच 'लावर खळी डोळ्यात धुंदी' हे एव्हरग्रीन गाणे स्वप्नीलने सादर केले. पहिल्याच गाण्याने एवढी उंची गाठल्यानंर पुढे काय, अशी उत्सुकता असलेल्या रसिकांना स्वप्नीलने लगेच "मन उधाण वाऱ्याचे'ची भेट देऊन डोलायला लावले. या नव्या पिढीच्या गाण्यांवर रसिकांचा जल्लोष सुरू असतानाच 'पिंजरा' या गाजलेल्या चित्रपटातील "गे साजणी...' या मराठी मनाच्या हृदयावर कोरलेल्या गीताने सभागृहातील ज्येष्ठ नागरिकांनाही ठेका धरण्यास भाग पाडले. यानंतर लगेच 'मल्हारवारी मोतीयाने आली भरून...' या गाजलेल्या गीताला 'न्स मोर' मिळाला. स्वप्नीलसोबत या बहारदार कार्यक्रमात त्याची साथ देणाऱ्या जान्हवीने 'सनई चौघडे' या चित्रपटातील 'प्रेमात पडतो जो तो येता जाता...' या गीताने एन्ट्री केली. मराठी मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या 'पेरी वाळूत माडाच्या बनात येना' या जान्हवीने गायलेल्या गाण्याने अधिक बहर आणली. 'जानेजां ढूंढता फिर रहा' हे गीतही स्वप्नीलने उत्तमरीत्या पेश केले. एका जमान्यात आपल्या ठेक्‍यावर रसिकांनी थिरकायला लावणारे शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत झालेली 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर', 'ओ हसीना जुल्फोंवाली' ही गाणी लागोपाठ सादर करताच रसिकांमध्ये उत्साह संचारला. त्यानंतर महंमद रफींनी गायलेली आणखी काही गीते स्वप्नीलने गायली. त्यात 'तुम जो मिल गये हो, तो ये लगता है' हे गीत आणि 'पर्दा है पर्दा' या कव्वालीचा समावेश होता. या मराठी-हिंदी गीतांनी रसिक बेभान झाले असतानाच जान्हवीने गायलेल्या 'रेशमाच्या रेघांनी', 'वाजले की बारा' या लावण्यांवर महिलांनीही ताल धरला. 'नटरंग'मधील 'वाजले की बारा' आणि 'जत्रा' चित्रपटातील जितेंद्र जोशीनेच लिहिलेल्या "कोंबडी पळाली' या गीतांना रसिकांनी डोक्‍यावर घेतले. शेवटी 'राधा ही बावरी'चे सूर स्वप्नीलने आळवले.

या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन करणाऱ्या जितेंद्र जोशीचा मंचावर मुक्त वावर सुरू होता. अधूनमधून कोपरखळ्या काढणाऱ्या जितूने गाण्यात दंग झालेल्या स्वप्नील आणि जान्हवीला त्यांच्या करिअरविषयी प्रश्‍न विचारून बोलतेदेखील केले.

संगीत संयोजन नागपुरातीलच पंकज सिंग यांचे होते. गिटारवर मनोज विश्‍वकर्मा, बेसगिटारवर सुमित भाल, बासरीवर अरविंद उपाध्ये, तबल्यावर बालू ऊर्फ पंकज यादव, ढोलकी आणि नालवर नितीन जनवारे, कोंगोवर रघुनंदन परटवार, ऑक्‍टोपॅडवर उल्हास चिटमुलवार, ड्रम्सवर राजेश ठाकूर यांनी साथसंगत केली. कोरसमध्ये श्‍वेता, अजय मलिक, प्रवीण मून यांचा समावेश होता.

सायंकाळी साडेपाचपासूनच रसिकांची पावले देशपांडे सभागृहाकडे वळू लागली होती. काही वेळातच सभागृह खच्चून भरल्याने काही दर्दी रसिकांना अक्षरशः उभे राहून हा कार्यक्रम बघावा लागला. आबालवृद्ध रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या स्वप्नीलची एक झलक बघण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू होती. खुर्च्यांवर जागा न मिळालेले शेकडो रसिक मांडी घालून अक्षरश: खाली बसले. रसिकांसाठी बाहेर एलसीडी प्रोजेक्‍टरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बाहेरही खच्चून गर्दी होती.

जान्हवीची नागपुरी कविता
जान्हवी अरोराने खास नागपूरवर कविता करून वेगळीच रंगत आणली. जितेंद्रने ती रसिकांना वाचून दाखविली. ती कविता अशी...
जिथे मिळती रसरशीत गोड संत्री
मिळती भारताला राजकारणात मुरलेले मंत्री
संगीत, नाट्यासह साहित्यावरही ज्यांचे प्रेम भरपूर
असे हे सर्वगुणसंपन्न नागपूर

जितूने रडविले अन्‌ हसविलेही
कार्यक्रम संपत आला असतानाच जितेंद्रने सभागृहात उपस्थित सर्व माउलींना नमस्कार केला आणि त्यांना समर्पित नारायण सुर्वे यांची "माय' कविता सादर केली. "हंबरल्या वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...' ही ती कविता दाटून आलेल्या कंठाने सादर करताच रसिकही भावूक झाले. वातावरण गंभीर झालेले पाहून प्रेमावरची एक हास्यकविताही त्याने सादर केली.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: