Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

वाघाला पकडण्यास वनविभाग ठरले अपयशी
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 12, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: tiger,   leopard,   nagpur,   vidarbha
सिंदेवाही -  मोहाळी-पेठगाव परिसरात मागील एक महिन्यांपासून सुरू असलेले व्याघ्रतांडव सध्या शांत झाल्याचे चित्र असले, तरी गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. परंतु, वनविभागाच्या प्रत्येक उपायावर मात करत आपणच जंगलाचे सम्राट असल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, तालुक्‍यातील मुरमाडी येथे वाघाचे दर्शन नित्यनेमाने होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पेठगाव ते शिवणी या पट्ट्यात वाघाने मागील महिन्यांत चार लोकांचा बळी घेतला. एरवी आपला पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्यात व्यस्त असलेले नागरिक पाचव्या बळीनंतर पेटून उठले. वनचौकीची तोडफोड, अधिकाऱ्यांना घेराव अशा प्रकारची आंदोलने ग्रामीण जनता करू लागली आहे. या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने युद्धपातळीवर वाघाला पकडण्यासाठी पावले उचलली. परंतु, नरभक्षक वाघाने प्रशासनाच्या सर्व उपाययोजनांवर मात करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. गावकऱ्यांना पदोपदी दिसणारा वाघ वनविभागाला दिसला नाही. दिसलाच तर त्याला जेरबंद करता आले नाही. वाघ जंगलात पळाला असे सांगत वनविभागाने काढता पाय घेतला. दोन दिवसांपूर्वी सिंदेवाहीपासून तीन-चार किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही-मुरमाडी या गावांमध्ये वाघाचे दर्शन झाले. मुरमाडी येथील जीवतोडे यांच्या बकरीचा घोटही या वाघाने घेतला. त्यामुळे वाघ पाण्याच्या शोधात इतरत्र भटकू लागल्याचे दिसते. त्यामुळे वनविभागाला जागरूक राहण्याची गरज आहे.

मुडझा येथेही तीच स्थिती
काही दिवसांपूर्वी मुडझा येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेस एका बिबट्याने ठार केले. हा बिबट्या महिनाभरापासून गावात धुमाकूळ घालत होता. मात्र, वनविभागाने कोणतेही पाऊल उचलले नाही. महिलेच्या मृत्यूनंतरही गावात पिंजरे लागले नाही.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: