'मोस्ट वॉंटेड' नक्षलवाद्याचे प्रेयसीसोबत पलायन
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 12, 2010 AT 04:00 AM (IST)
सुरेश नगराळे : सकाळ वृत्तसेवा
गडचिरोली - "मोस्ट वॉंटेड' भामरागड नक्षलदलमचा कमांडर सर्जू ऊर्फ जुरू मानकू तुमरेट्टी याची पदावनती झाल्याने त्याने आपल्या प्रेयसीसह पलायन केल्याची
विश्वसनीय माहिती आहे. पोलिस खबऱ्याची हत्या, जाळपोळ तसेच नुकत्याच लाहेरी येथे झालेल्या 17 पोलिसांच्या हत्येच्या घटनेत सर्जूने प्रमुख भूमिका बजावली होती.
एटापल्ली तालुक्यातील जांभिया गट्टा परिसरातील रहिवासी सर्जू ऊर्फ जुरू मानकू तुमरेट्टी 12 वर्षांपूर्वी नक्षलदलममध्ये भरती झाला होता. सुरवातीला गट्टा दलममध्ये काम केल्यानंतर वरिष्ठांनी त्याला बढती देऊन भामरागड दलमची जबाबदारी त्याच्याकडे सोपविली होती. गेल्या पाच वर्षांपासून सर्जू दलमकमांडर म्हणून काम करीत होता. या पाच वर्षांच्या कारकिर्दीत सर्जूने भामरागड तालुक्यात 50 च्या वर घटना घडवून आणल्या. भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यात तो पटाईत असल्यामुळे वरिष्ठांनी त्याच्याकडे एटापल्ली व अहेरी तालुक्याच्या काही भागाचीदेखील जबाबदारी सोपविली होती. लाहेरी येथे काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी 17 पोलिसांची हत्या केली होती. या घटनेत सर्जूची प्रमुख भूमिका असल्याचे समजते. याशिवाय पोलिस खबऱ्यांची हत्या, वाहनांच्या जाळपोळीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. भामरागड पोलिस ठाण्यात सर्जूविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
तेंदूपत्ता व रस्ते कंत्राटदारांकडून खंडणीवसुलीची जबाबदारीही त्याच्याकडे होती. "क्विक ऍक्शन' घेऊन घटना घडविण्यात पटाईत असलेला सर्जू काही दिवसांपूर्वीच डिव्हिजनल मेंबर झाला होता. मात्र, दलममधील एका महिलेसोबत सुरू असलेले प्रेमप्रकरण वरिष्ठांच्या लक्षात आल्याने त्याला तंबी देण्यात आली होती; परंतु त्यानंतरही सुधारणा न झाल्याने अखेर सर्जूचे कमांडरपदाहून "डीमोशन' करून सदस्य म्हणून काम करण्याचे सांगण्यात आले होते. वरिष्ठांच्या कारवाईने दुखावल्या गेल्याने दोन महिन्यांपूर्वी सर्जूने दलमला रामराम ठोकून रेखा नामक प्रेयसीसोबत पलायन केल्याचे समजते. सर्जू गेल्याने नक्षलवादी संघटनेला जबर धक्का बसला. सध्या भामरागड दलमचे काम जयराम गावडे याच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त आहे.
छत्तीसगडकडे पलायन
नक्षलवादी सर्जू पोलिसांच्या हीटलिस्टवर असून; सध्या पोलिस आणि नक्षलवादीही त्याच्या मागावर आहेत. यामुळे तो भूमिगत झाल्याची चर्चा सर्वत्र असून; दलम कमांडर
सर्जूने आपल्या प्रेयसीसह छत्तीसगड राज्यात आश्रय घेतल्याचे समजते.