अशिक्षित संशोधकास १० लाखांचे अर्थसाहाय्य
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 12, 2010 AT 04:42 PM (IST)
जळगाव - "थ्री इडियट' या चित्रपटामुळे देशभर कौतुकाचा विषय ठरलेल्या जळगावच्या जहॉंगीर पेंटरची अदभूत स्कूटर राष्ट्रपती भवनाच्या प्रदर्शनात पोचली आहे. आपल्या असामान्य प्रतिभेचे धनी असलेले जहॉंगीर यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व त्याच्यातील असलेल्या कल्पकतेला वाव मिळाला म्हणून जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी पंतप्रधान रोजगार गॅरंटी निमिर्ती कार्यक्रमांतर्गत (पीएमइजीपी) त्यांना 10 लाखांचे कर्ज प्रकरण मंजूर केले आहे. या रकमेतून विविध प्रकारच्या पिठाच्या गिरण्या निर्मितीचा उद्योग ते सुरू करणार आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतंर्गत जहॉंगीर यांचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे त्यास आपल्या स्वतःचा व्यवसाय उभारता येणार आहे. प्रशासनाने स्वतःहून घेतलेल्या पुढाकारानेच त्यांचे प्रकरण मंजूर झाले आहे. त्याचा मूळ प्रस्ताव हा पिठाच्या विविध प्रकारच्या गिरण्या निर्मिती करण्याचा असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भांबरे यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले.
संशोधकांचेही लक्ष वेधून घेणारी शेख जहॉंगीर यांची आगळी वेगळी स्कूटर "थ्री इडियट' या चित्रपटातील अभिनेत्री करिना कपूर ने वापरली होती. ही स्कूटर म्हणजे फिरते दळण केंद्रच. वास्तविक शेख जहॉंगीर हे रंगकाम करणारे अशिक्षित व्यक्ती पण आपल्या संशोधक प्रतिभेमुळे त्यांनी या स्कूटरची निर्मिती करून त्यामधील अदभूत कल्पना शक्तीची प्रचिती आणून दिली. असामान्य प्रतिभा असलेल्या शेख यांना स्वतःचा असा रोजगार नसल्यामुळे त्यांनी गेल्या जानेवारी 2010 मध्ये झालेल्या खानदेश महोत्सवादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व मला स्वतःच्या पायावर उभे राहाता येईल, यासाठी आपण काही करू शकता का, अशी विचारणा केली. जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनाही त्यांच्या प्रश्नाने अस्वस्थ केले. श्री. कुणाल कुमार यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.भांबरे यांना बोलावून घेतले व या प्रतिभावंतास स्वयं रोजगारासाठी काय करता येईल, असे सांगून पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे प्रस्ताव तयार झाला आणि मंजूर करून स्टेट बॅंकेत पाठविण्यात आला आहे. येत्या 31 मार्च पूर्वी शेख जहॉंगीर यांना मंजूर अर्थ साहाय्याची रक्कम बॅंकेकडून मिळेल, असे श्री. भांबरे यांनी सांगितले.