ट्रॅक्टरवर ट्रक धडकून तीन ठार; दोन जखमी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 13, 2010 AT 01:00 AM (IST)
रेणापूर - ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रक आदळून तीन जण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. 12) रात्री साडेआठच्या सुमारास निवाडा फाट्याशेजारील (ता. रेणापूर) पुलावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूरकडे जाणारा ट्रक (एमएच 04-बीयु-1989) पन्नगेश्वर साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरवर मागून जोरात आदळला. तीनपैकी एका मृताचे नाव नागेश भोसले (वय 22, रा. नागरसोगा, ता. औसा) असे आहे. त्याचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अन्य दोन मृत व जखमींची नावे कळू शकली नाहीत. ट्रकचालक व आणखी एक जण जखमी झाले. त्यांना रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक एम. व्ही. जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विठ्ठलराव गिते, शिपाई रावसाहेब चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.